‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली लाखोंची फसवणूक;
पाचोरा-
दुचाकी, चार चाकी वाहनांचे व मोठ्या वस्तूंचे आमिष दाखवून लकी ड्रॉ व बक्षिसांची भव्य सोडतीच्या नावाखाली पाचोऱ्यात लाखो रुपयांची फसवणूक करीत कोणतीही बक्षीस किंवा वस्तू न देता आरोपींनी पोबरा केल्याची घटना पाचोरा-वरखेडी रोडवरील साईमोक्ष रिसॉर्ट अँड लॉन्स येथे घडली. फसवणूक झाल्या प्रकरणी पाचोरा पोलिसात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
‘श्री महालक्ष्मी एंटरप्राइजेस’ या नावाखाली पत्रक छापून त्यावर रजिस्ट्रेशन नंबर टाकून दुचाकी व चार चाकी वाहनांची मोठ्या वस्तूंची छायाचित्र छापून बक्षिसांची लय लूट म्हणून रूपये पंधराशेच्या कुपनचे पत्रक छापले. त्यावर बक्षिसांची भव्यतम सोडत म्हणून पाचोरासह तालुक्यातील नागरिकांना ५ हजार ५५५ कुपन वितरित करून कोट्यवधींची माया जमा केली. २९ नोव्हेंबर रोजी पाचोरा-वरखेडी रोडवरील ‘साईमोक्ष रिसॉर्ट अँड लॉन्स’ ह्या ठिकाणी भव्यतम सोडतचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी श्री महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे संचालक अरुण आहेर, फरीदशेठ, आकाश पाटील, संजय पाटील, पुंडलिक कदम, मिलिंद संसारे, दिनेश व्यवहारे, ज्ञानेश्वर जेटे ही पत्रकावर असलेली नावे संचालकांची असून ते या ठिकाणी हजर होते. मात्र त्यांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारची बक्षिसे न देता लोकांचा जमाव पाहून तेथून पळ काढला. यावरून नागरिकांच्या लक्षात आले की, आपली फसवणूक केली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात ज्ञानेश्वर चिंतामण खैरनार (रा. शेवाळे, ता. पाचोरा) यांनी पाचोरा पोलीस निरीक्षकांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. तसेच किरण निंबा चौधरी (पाचोरा), संतोष मधुकर चंदने (रा. निंभोरी बुद्रूक, ता. पाचोरा), राजेंद्र सांडू पाटील (रा.लोहारी बुद्रूक, ता. पाचोरा) यांनीही यासंदर्भात पाचोरा पोलिसात तक्रार दिली आहे.
दरम्यान, याप्रकरणी पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्याशी संपर्क केला असता कोट्यवधीच्या लकी ड्रॉचा प्रकार साई मोक्ष रिसॉर्ट येथे झाल्याचे पोलिसांना कळाले होते. या संदर्भात तक्रार अर्ज प्राप्त झाला असून प्रथमदर्शनी या प्रकरणी कोणत्याही प्रकारे गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नसल्याने तूर्तास कारवाई करता आली नाही. सखोल चौकशीअंती संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले. प्राप्त तक्रार अर्जाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल शिंपी करीत आहे.