पुण्यातील आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हला कवी वैभव प्रभाकर महाजन यांची निवड
जळगाव-
देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत पुण्यात पहिल्यांदाच २ जानेवारी ते पाच जानेवारी सकाळी ९ ते रात्री ९ असे चार दिवसीय आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे आयोजन एस एम जोशी फौंडेशन सभागृह, नवी पेठ पुणे येथे करण्यात आले आहे. यात उत्राण ता.एरंडोल जी.जळगाव येथील कवी वैभव प्रभाकर महाजन यांची निवड झाली असुन तसे पत्र आयोजकांचे प्राप्त झाले आहे. चार दिवसीय फुले फेस्टिव्हल मध्ये जनजागृती व प्रबोधनपर विविध उपक्रमांची रेलचेल असणार आहे. पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात क्रांती सूर्य महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली, या शाळेचा इतिहास जतन व्हावा, फुलेंच्या या कार्य कर्तृत्वाचा प्रचार प्रसार व्हावा, हा इतिहास पुढच्या पिढ्या पर्यंत पोहोचावा या एकमेव उद्देशाने या एकाच विषयावर आधारीत देश विदेशातील जवळपास पाचशे कवींचा महोत्सव, भिडेवाडा या विषयावर मराठी काव्य गझल मुशायरा, एक पात्री, शाले य विद्याथ्याच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगितिक पोवाडे, महिला सक्षमीकरणासाठी लाठी काठी, दांडपट्टा यांचे प्रात्याक्षिक इत्यादी उपक्रम होणार आहेत. या भिडे वाडा अभियाना अंतर्गतील या चळवळीत विशेष कार्य करणाऱ्या जगभरातील २५ फुलेप्रेमी कवी कवयित्री कार्यकर्त्यांना जगातील या पहिल्याच आंतरराष्ट्रीय फुले समाजरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. फुले फेस्टिव्हल सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे. चारही दिवस कवी, कलाकार व रसिकांना चहा, नाश्ता व दुपारचे जेवण मोफत असणार आहे. फुले फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच शेकडो कवयित्री सावित्रीबाई फुलेंच्या वेशभुषेतच कविता सादर करणार आहेत क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या उत्तुंग कार्य कर्तृत्वाचा जागर कविता, गझल, विविध कलाकृतीच्या उपक्रमांतून नव्याने व्हावा या एकमेव हेतूने जगातील पहिल्याच आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे आयोजन पुण्यात करण्यात आल्याचे सांगून, सर्व फुलेप्रेमी कवी आणि रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन या अभियानाचे व पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे आयोजक फुलेप्रेमी शिक्षक कवी विजय वडवेराव यांनी केले आहे.