परधाडे येथे वीज फॉल्टमुळे लागलेल्या आगीत 2 एकर मका जळून खाक – शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

परधाडे-
पाचोरा तालुक्यातील परधाडे येथील शेतकरी दत्तू हरी पाटील यांच्या शेतात वीज फॉल्टमुळे लागलेल्या आगीत सुमारे 2 एकर मका जळून खाक झाला आहे. ही दुर्घटना दिनांक 2 मे रोजी सकाळच्या सुमारास घडली. यात अंदाजे 2.5 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.दत्तू हरी पाटील यांनी त्यांच्या मालकीच्या गट नंबर 112/1 या शेतजमिनीत यावर्षी 2 एकर क्षेत्रावर मका पीक घेतले होते. पीक पूर्ण वाढलेले असून, चार दिवसांपूर्वी या मक्याची कापणी व खुडणी करण्यात आली होती. कापणी केलेला मका व त्याचा चारा शेतातच सुकवण्यासाठी पसरवून ठेवण्यात आला होता.

नियोजनानुसार पुढील 4-5 दिवसांत तो पूर्ण सुकवून घराकडे वाहून नेण्याचे नियोजन होते.मात्र 2 मे रोजी सकाळी अचानक शेतालगतून गेलेल्या विद्युत वाहिनीमध्ये फॉल्ट झाला आणि त्या ठिकाणी ठिणग्या पडल्यामुळे मका व चाऱ्याला आग लागली. उन्हाच्या तीव्रतेमुळे आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. शेजाऱ्यांनी आणि पाटील कुटुंबीयांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीचा वेग जास्त असल्यामुळे पूर्ण मका व चारा जळून खाक झाला.

घटनेची माहिती मिळताच तलाठी ज्योती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी त्यांनी पीडित शेतकऱ्याच्या नुकसानाची नोंद घेतली. त्याचबरोबर महावितरणचे वीज पुरवठा अधिकारी व वायरमन यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली व वीज वाहिनीची पाहणी केली.या घटनेमुळे पाटील कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले असून, शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी व नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून वीज वितरण कंपनीने यंत्रणांची वेळोवेळी तपासणी करून उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी केली जात आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघण्यासाठी शासनाची तातडीने मदत महत्त्वाची ठरणार आहे.





