अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान,बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनतर्फे तातडीच्या पंचनाम्याची मागणी

पाचोरा-
पाचोरा तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली असून, यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनने तातडीने प्रशासकीय कामकाज थांबवून नुकसानीचे पंचनामे करण्याची जाहीर विनंती पाचोरा तालुक्याचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना केली आहे.बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून उभ्या पिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कापूस, मका, सोयाबीन आणि इतर सर्व प्रकारच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
या गंभीर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, महसूल व कृषी विभागाने तातडीने सक्रिय व्हावे, अशी मागणी फाऊंडेशनने केली आहे. “कार्यालयीन कामे थांबवून, अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करावेत,” असे आवाहन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.पंचनाम्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून त्याचा शासकीय अहवाल शासन दरबारी त्वरित सादर करावा, जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळू शकेल, अशी मागणीही करण्यात आली आहे. “शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत अती तात्काळ जाहीर करावी, ही आमची नम्र विनंती आहे,” असे फाऊंडेशनने म्हटले आहे.या मागणीमुळे आता पाचोरा तालुक्याचे तहसीलदार, श्री. विजय बनसोडे, आणि तालुका कृषी अधिकारी, श्री. सुधाकर वासुदेव कराड (प्रभारी), यांच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. प्रशासन यावर काय कारवाई करते आणि शेतकऱ्यांना कधीपर्यंत दिलासा मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




