17 सप्टेंबरच्या आधी कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करा,मनोज जरांगें पाटील यांची सरकारकडे मागणी..

छ.संभाजीनगर-
मराठा आरक्षणासाठी मुंबईत केलेल्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी सरकारकडे केले आहे.ही प्रक्रिया 17 सप्टेंबरच्या आधी सुरू करा अशी मागणी जरांगेंनी सरकारकडे केली आहे. यावेळी त्यांनी सरकारला इशारा देखील दिला आहे.मनोज जरांगे पाटील माध्यमाशी बोलताना म्हणाले, 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. त्याच्या आत हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे. आम्ही जितकं कौतुक केलं, पुन्हा आम्हाला वाटायला नको की तुम्ही फक्त हुलकावणी देत आहात की काय?” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. 17सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हावी अशी माझी सरकारला विनंती आहे आणि यामध्ये कोणताही बदल करू नये असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.तुम्ही आता ठरवलंयच तर मनुष्यबळ द्या. तिघांची गावागावातील समिती आहे तिला तातडीने कामाला लावा. हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदीच्या आधारे मराठवाड्यातील मराठ्यांना किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू झाले पाहिजे. अन्यथा मला पुन्हा नाइलाजाने मोठा निर्णय घ्यावा लागेल, असे जरांगे म्हणाले आहेत.वेळ आली तर आमच्या गावात, आमच्या घरी येणे राजकीय नेत्यांना बंद करावे लागेल हे मात्र लक्षात ठेवा. तुमच्यावर कोणी दबाव आणेल.जीआर कशाला काढला हे असे शब्द नको होते.जर कोणाचं ऐकून आमची हेळसांड झाली तर पुन्हा खूप वाईट दिवसं तुमच्या चुकीमुळे येऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी, ही मी विनंती करत आहे. धमकी नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.गरीबाच्या पोरांनी आणि मी मिळून एक जीआर काढला की हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र द्यावेत, अर्धा महाराष्ट्र पागल झाला. काही अभ्यासकही पागल झाले. जीआर आणि त्यातील शब्द बघून आमच्या विरोधातील काही जण तर इतके पागल झाले की त्यांना झोपच येत नाहीये. इतक्या मजबूतीने जर गरीबांच्या पोरांनी जीआर काढला आहे, तर मराठवाडा १०० टक्के आरक्षणात जाणार, असे मनोज जरांगे म्हणाले.मराठ्यांना माझा एक सल्ला आहे, जुनी म्हण आहे की विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय देखील पचवता आला पाहिजे. खूप आनंद झाला आहे पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या गॅझेटनुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा गॅझेटनुसार आरक्षणात जाऊद्या आणखी मोठा आनंद व्यक्त करू. काही लोकं सध्या बिथरले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठ्यांच्या लोकांनी थोडं संयमाने घ्या.
गॅझेटियरची तातडीने अंमलबजावणी केली नाही तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला सरकारच्या विरोधात आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.





