जळगाव जिल्हा

पूरग्रस्तांसाठी सिद्धीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा पुढाकार
विनामूल्य तपासणी व औषधोपचार सप्ताहाचे आयोजन..

पाचोरा-

पाचोरा, सोयगाव तालुक्यातील ढगफुटीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीने शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. घरांचे, जनावरांचे, शेतीचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान सावरण्याआधीच आता साथीच्या आजारांचे संकट डोके वर काढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुराच्या पाण्यामुळे गावोगाव साचलेले चिखल व अस्वच्छ वातावरण यामुळे ताप, अतिसार, डेंग्यू, मलेरिया, पोटाचे विकार, त्वचारोग तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याची शक्यता वाढली आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर सिद्धीविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत पाऊल उचलले आहे. हॉस्पिटलच्या वतीने विशेष तपासणी व उपचार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमात पूरग्रस्त व गरजू रुग्णांची तपासणी पूर्णपणे विनामूल्य करण्यात येणार असून आवश्यक औषधोपचारही मोफत पुरवले जाणार आहेत. हॉस्पिटलचे संस्थापक व प्रमुख तज्ज्ञ डॉ. स्वप्निल पाटील व डॉ. ग्रिष्मा पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, “पूरामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांची तब्येत ही मोठी चिंता आहे. जनतेच्या आरोग्याचे रक्षण करणे ही आमची सामाजिक बांधिलकी आहे. म्हणूनच हा विशेष आरोग्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे.” तपासणी सप्ताहादरम्यान सर्वसामान्य आजारांसोबतच महिलांचे व मुलांचे आरोग्य, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांची मोफत तपासणी केली जाणार आहे. तसेच गरज भासल्यास रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून आवश्यक उपचारही मोफत दिले जाणार आहेत. “पूरग्रस्त परिस्थितीत नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे लहान मुले व वृद्ध व्यक्तींचा आजारांचा धोका वाढतो हे लक्षात घेऊन आम्ही वैद्यकीय तज्ज्ञांची विशेष टीम तयार केली आहे असे हॉस्पिटल च्या बालरोगतज्ञ डॉ. ग्रिष्मा पाटील यांनी सांगितले. पाचोरा शहरासह आसपासच्या गावांमधील पूरग्रस्त नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या माध्यमातून योग्य वेळी उपचार मिळाल्यास संभाव्य रोगराई रोखण्यात मदत होणार आहे. आपत्तीच्या काळात रुग्णसेवेचा ध्यास घेतलेल्या सिद्धीविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. पूराच्या तडाख्याने हतबल झालेल्या नागरिकांना यामुळे आरोग्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!