नागपूर-
वर्धा मार्गाजवळील एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ०९:३० ते १०;०० दरम्यान एकाने अत्याचार केला होता. आठवडा उलटून सर्व प्रयत्न करूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
त्यामुळे आरोपीबद्दल माहिती देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
याआधी पोलिसांनी या आरोपीचे स्केच जारी केले होते. हिंगणा ठाणे व इतरही ठाण्यांतील डीबी व शहर गुन्हे शाखेचे पथक रात्रंदिवस तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी इतर राज्यांत पथक रवाना केले. मात्र घटनेला आठवडा उलटूनही पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला नाही. हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीत ४ ऑक्टोबर रोजी वर्धा मार्गावरील अभियांत्रिकी महाविद्यालयाची तरुणी निर्जन मार्गाने महाविद्यालयाकडे जात असताना नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग केला होता.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल केला. मात्र फरार आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस आयुक्त अमितेश कुमार व पोलीस परिमंडळ क्र. १चे पोलीस उपायुक्त डॉ. अनुराग जैन यांनी तपासावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सहा. पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळे, ठाणेदार विशाल काळे व सपोनि. पांडुरंग जाधव यांच्या नेतृत्वात दररोज शोधमोहिमेचा आढावा सुरू आहे. सात दिवस होऊनही पोलिसांच्या हातात आरोपीचा सुगावा लागला नाही. याचा पोलीस शोध घेत आहेत.
आरोपीविषयी माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपयांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले आहे. असा व्यक्ती कुठे आढळला, तर तत्काळ माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. आरोपीबाबत माहिती असणाऱ्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल काळे (९८२३०१८४८१) यांच्याशी तसेच पोलिस नियंत्रण कक्षाच्या ०७१२२५६१२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हिंगणा पोलिसांनी केले आहे.