नाशिकची कायदा व सुव्यवस्था धोक्यात; मंत्री दादा भुसेंचा पोलिस आयुक्त यांना’अल्टिमेटम’

नाशिक-
वाढत्या गुन्हेगारीमुळे शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून, शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी सात दिवसांचा ‘अल्टिमेटम’शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शहर पोलिसांना देत, गुन्हेगारी घटनांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी असला तरीही पोलिसांनी दबावाला बळी न पडता कारवाई करा, तसेच, रस्त्यावर पोलिस दिसला पाहिजे तरच, गुन्हेगार, विधीसंघर्षितांवर वचक बसेल.शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी दक्ष राहावे, अशीही सूचना मंत्री भुसे यांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना केल्या आहेत.गेल्या काही दिवसात शहरातील वाढती गुन्हेगारी आणि बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेचे गंभीर दखल मंत्री भुसे यांनी घेतली. सोमवारी (ता. २९) मंत्री भुसे यांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली. यावेळी उपायुक्त मोनिका राऊत, किशोर काळे, चंद्रकांत खांडवी, संदीप मिटके उपस्थित होते.यावेळी आयुक्त कर्णिक यांनी शहरातील गुन्ह्यांची माहिती मंत्री भुसे यांना दिली. तसेच, नजीकच्या काळात घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये राजकीय पक्षाच्या नेत्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यासंर्दभातील कारवाईची माहिती आली.भुसे यांनी शहरातील गुन्हेगारीचा आढावा घेतल्यानंतर, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त कर्णिक यांना केल्यात. तसेच, शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर उतरावे, सामान्याच्या सुरक्षिततेसाठी गुन्हेगारांची गय न करण्याची सूचना केली. यावेळी अजय बोरस्ते, विजय करंजकर, विलास शिंदे आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.शहरातील अमली पदार्थाविरोधात शहर पोलिसांनी चांगली कामगिरी आहे. विधीसंघर्षिताचे वय कमी करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रस्त्यावरची पोलिसिंग दिसायला हवी. त्यामुळे आठवडाभरात सकारात्मक परिणाम दिसतील.गुन्हेगारांविरोधात कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. स्ट्रीट क्राईम रोखण्यासाठी प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून, तातडीने कारवाई सुरू करण्यात आल्या आहेत. जागरूक नागरिकांनीही टवाळखोरांबाबतची माहिती सीपी व्हॉटसअॅप ९९२३३२३३११ यावर द्यावी.असे आवाहन देखील करण्यात आले.





