जामनेर नगरपरिषद निवडणूकीत बोगस मतदानाचा भांडाफोड,दोन प्रकरण उघड तक्रारी दाखल

जामनेर-
जामनेर नगरपरिषद निवडणुकीदरम्यान गंभीर स्वरूपाचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मतदानाच्या दिवशीच वार्ड क्रमांक १० मध्ये बोगस मतदानाचे दोन स्पष्ट प्रकार समोर आले असून, याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे तालुकाध्यक्ष किशोर श्रीराम पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जामनेर पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी मतदार संघात मतदान सुरू असताना वार्ड क्रमांक १० मध्ये पहूर कसबे येथील रहिवासी रोशन विनोद चौधरी हा प्रत्यक्ष मतदार नसताना बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे अधिकृत उमेदवार आकाश उर्फ पवन बंडे यांनी त्याला रंगेहात पकडून तत्काळ पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.याच वार्डमध्ये आणखी एका गंभीर घटनेचा उलगडा झाला. श्रद्धा सुनील बोहरा या नावाने बनावट आधार कार्ड तयार करून एका तरुणीने मतदान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशय येताच संबंधित तरुणीला पकडण्यात आले. आधार कार्डवरील छायाचित्र आणि प्रत्यक्ष व्यक्ती यामध्ये स्पष्ट तफावत असल्याचे निदर्शनास आल्याने हे कार्ड बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बनावट आधार कार्डची छायांकित प्रत पोलिस स्टेशन तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आली आहे.या व्यतिरिक्त, वार्ड क्रमांक ८ व ९ मध्येही बोगस मतदानाचे प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, संबंधित आरोपी पळून गेल्याने त्यांना पकडता आले नसल्याची माहितीही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
किशोर पाटील यांनी आपल्या तक्रारीत बोगस मतदान, खोटे दस्तऐवज तयार करणे व मतदार याद्यांच्या गैरवापरासंदर्भात सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसेच जामनेर तालुक्यात कार्यरत असलेल्या बोगस आधार कार्ड तयार करणाऱ्या रॅकेटची उच्चस्तरीय चौकशी करून ते उध्वस्त करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.निवडणूक प्रक्रियेची पवित्रता आणि मतदारांचा विश्वास टिकवण्यासाठी निवडणूक आयोग व पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे जामनेर नगरपरिषद निवडणूक चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, प्रशासन पुढे काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




