सप्तश्रृंगी गड घाटात,अपघातात मृत्यू झालेल्या भाविकांचे नावे आली समोर, सर्व पिंपळगाव बसवंतचे रहिवासी…

नाशिक-
नाशिकच्या सप्तश्रृंगी गडाच्या दिशेला जाणाऱ्या घाटावर संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. रविवारी सायंकाळी सप्तश्रृंगी गडावरुन दर्शन घेऊन परतत असताना एक इनोव्वा कार खोल दरीत कोसळली या अपघातात गाडीतील सर्व सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त गाडीचा एम एच 15 बी एन 0555 असा नंबर आहे. या गाडीतील सर्व भाविक हे पिंपळगाव बसवंतचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. कळवण महसूल विभागाकडून घटनेतील मृतकांबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची गाडी क्रमांक एम एच 15 बी एन 0555 घाटात भवरी धबधब्याजवळ ओव्हरटेकच्या नादात संरक्षण कठडे तोडून खोल दरीत कोसळली.

या अपघातात पटेल परिवारातील सहा जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. अपघातातील सर्वजण हे पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी होते. किर्ती पटेल (वय 50), रशिला पटेल (वय 50), विठ्ठल पटेल (वय 65), लता पटेल (वय 60), पचन पटेल (वय 60), मनी बेन पटेल (वय 70) असे मृतकाचे नावे समोर आली आहेत. घटनेची माहिती मिळताच सप्तशृंगी गड आणि वनी पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत कार्य करण्यास सुरुवात केली. पण अपघातातील गाडी ही खोल दरीत कोसळल्याने आणि दिवस मावळत असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे नाशिकवरून रेस्क्यू टीमला पाचरण करण्यात आले होते. या अपघाताच्या घटनेवर संपूर्ण नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दु:ख व्यक्त केलं जात आहे.
सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक येतात. पण शनिवार आणि रविवारच्या दिवशी सुट्टी असल्याने या दिवशी भाविकांची जास्त गर्दी असते. त्यामुळे घाटातही वाहनांची वर्दळ असते. घाट परिसरात गाडी हळू चालवण्याचं आवाहन नियमित केले जाते. कारण थोडीही चूक झाली तर जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.झालेल्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या अपघातात जीवितहानी झाली आहे.
या घटनेबाबत मुख्यमंत्री देविंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.




