श्री.गो.से. हायस्कूलमध्ये ‘कलारंग’ उत्साहात;विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाली नवी दिशा..

पाचोरा-
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे शालेय वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘कलारंग २०२५–२६’ या बहारदार सांस्कृतिक, शैक्षणिक व कलात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १ जानेवारी २०२६ ते ३ जानेवारी २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत हा कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, आत्मविश्वास वाढवणे आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ‘कलारंग २०२५–२६’ समारंभाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्थापन समिती चेअरमन खलील देशमुख हे होते.

कलारंग अंतर्गत रांगोळी स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन,हस्तकला, तसेच सामूहिक नृत्य, गीतगायन,बालनाट्य,फॅन्सी ड्रेस अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मुख्याध्यापक एन. आर. पाटील यांनी शाळेने विद्यार्थ्यांसाठी एक खुले व्यासपीठ निर्माण करून दिले असून गत शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी आणि शाळेने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच भविष्यात देखील शाळा अनेक विद्यार्थीभिमुख कार्यक्रम राबवणार असल्याचे सांगितले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभागाचे प्रमुख महेश कौंडिण्य यांनी करून दिला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य वक्ते कवी व साहित्यीक प्रा. वा. ना. आंधळे यांनी आपल्या भाषणात मुलांचे आईवरचे प्रेम व्यक्त करणारी कविता गाऊन दाखवताना शाळा म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि ज्ञान रुजवणारे केंद्र असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांसह पालकांचीही आहे. सद्यस्थितीत मोबाईलच्या माध्यमातून अनेक गुन्हे घडतांना आम्ही रोज बघतो. मात्र विद्यार्थ्यांनी मोबाईलचा उपयोग सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी करावा.

हे करत असतांना आपल्या पाल्यांकडे लक्ष देणे पालकांची जबाबदारी आहे.अध्यक्षीय भाषणात खलील देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेने आणि शाळेने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी गट शिक्षणाधिकारी विजय पवार,संस्थेचे संचालक मधुकर सांडू पाटील, जिजाबाई पाटील,प्रकाश पाटील, भागवत महालपुरे,भडगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक ए बी अहिरे, उज्वला साळुंखे सिद्धीविनायक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल पाटील, मयुर सराफ, नंदकुमार कोतकर , अनुराग भारतीया,अतुल शिरसमणे, स्वप्नील ठाकरे, एस.एच.पवार, पी.जे.पाटील, पी.पी.पाटील,आकाश वाघ,शांताराम चौधरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, सादरीकरण कौशल्य आणि संघभावना अनुभवायला मिळाली. आज शुक्रवार २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विज्ञान प्रदर्शन, चित्रकला व हस्तकला प्रदर्शनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैज्ञानिक मॉडेल्समधून त्यांची प्रयोगशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून येणार आहे. शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत कार्यक्रमांचा समारोप होणार असून याच दिवशी दुपारी ३ वाजता पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विलास जोशी हे असतील तर पारितोषिक वितरण संस्थेचे अध्यक्ष तथा मा. आ. दिलीप ओंकार वाघ यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, मानद सचिव अॅड. महेश देशमुख, श्री गो. से. हायस्कूलचे तांत्रिक विभाग प्रमुख वासुदेव महाजन यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती व तांत्रिक विभाग व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक एन. आर. पाटील (ठाकरे), उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, पर्यवेक्षक आर. बी. तडवी, पर्यवेक्षक आर. बी. बांठिया,सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौंडीण्य, उपप्रमुख रविंद्र बोरसे, क्रिडा प्रमुख एस. पी. करंदे, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालयीन अधीक्षक अजय सिनकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमात जवळपास २५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर बी बोरसे यांनी केले तर आभार उज्वल पाटील यांनी मानले.



