जिल्हा परिषद शाळा पष्टाने येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती अभिवादन करत केली साजरी

धरणगाव-
धरणगाव तालुक्यातील पष्टाने येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करत अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी शाळेतील दिव्या सुनिल सोनवणे ह्या विद्यार्थिनीने महापुरुषांच्या जयंती निमित्ताने वेगवेगळ्या पध्दतीने वेशभूषा परीधान करून कार्यक्रमात भाग घेत असल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले कोण होत्या त्यांनी आपल्या जिवनात कश्या प्रकारे संघर्ष करत मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन भाषणात बोलतांना,महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात स्त्री शिक्षणाला होत असलेला विरोध झुगारुन स्वतः शिक्षण घेतले,शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करुन त्या मुख्याध्यापिका झाल्यात, मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली,३जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणाचे अमूल्य योगदान हा देश कधीही विसरू शकणार नाही,स्त्री शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या सावित्रीबाईंनी बहुजन मुक्तीचा भक्कम पाया रचला. त्यांनी मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले आणि शोषित-वंचितांना आत्मसन्मानाचा मार्ग दाखवला. विधवा पुनर्विवाह, बालविवाहविरोधी लढा आणि सत्यशोधक विचारांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक परिवर्तनाची मशाल पेटवली.आजही सावित्रीबाईंचा विचार अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा देतो. समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मूल्यांवर आधारित त्यांचा क्रांतिकारी वारसा पुढे घेऊन जाणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल असे मनोगत बोलतांना व्यक्त केले. यावेळी शिक्षिका मीना पाथरे, रुपाली पतंगराव पाटील, शिक्षक दिनेश निकम यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती.




