राज्य कला प्रदर्शनात अनिलदादा देशमुख महाविद्यालयाचा दबदबा; ६ विद्यार्थ्यांच्या ७ चित्रांची निवड

पाचोरा-
सांगली येथे आयोजित होणाऱ्या ६५ व्या राज्य कला प्रदर्शनासाठी पाचोरा येथील अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयातील ६ विद्यार्थ्यांच्या ७ कलाकृतींची निवड करण्यात आली आहे. कलाकृती निवडीची आपली परंपरा कायम राखत महाविद्यालयाने राज्य स्तरावर आपले स्थान अधोरेखित केले आहे.

या राज्यस्तरीय कला प्रदर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कला महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाठविल्या जातात. या पार्श्वभूमीवर, पाचोरा येथील अनिलदादा देशमुख कला महाविद्यालयातील कलाशिक्षक प्रशिक्षण वर्गातील प्रथम व द्वितीय वर्षाच्या एकूण २५ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ७ चित्रांची निवड समितीकडून करण्यात आली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम वर्ष वर्गातील नेहा ज्ञानेश्वर पाटील हिने घड्याळ हा घटक घेऊन आकर्षक डिझाईन विषयातील चित्राची निवड झाली आहे. सारिका भगवान पाटील या विद्यार्थिनीने संगीत या विषयावर डिझाईन साकारले आहे. वैष्णवी कोळी हिने पेन्सिल माध्यमात ग्रामीण भागातील जात्यावर दळण दळणारी स्त्री रेखाटली आहे.

तसेच द्वितीय वर्षातील भूमी मनोज पाटील या विद्यार्थिनीने बरणी, केळीचे पान, कांदा भाकरी या माध्यमातून शेतकरी जीवनावर आधारित ऑब्जेक्ट ड्रॉइंग केले आहे. दिशा शिवकुमार ठाकूर या विद्यार्थिनीने महिलेचा शृंगार या विषयावर रचनाचित्र आणि बाजार हा विषय घेऊन स्मरणचित्र रेखाटले आहे, तिच्या या दोन्ही चित्रांची निवड झाली आहे. अश्विन कुमार नानाभाई कुवर या विद्यार्थ्याने ब्लॅक पेन माध्यमात चहाची बरणी व सफरचंद यांचे स्टिपलिंग पद्धतीने रेखाटन केले आहे.

हे राज्य कला प्रदर्शन सांगली येथे भरविण्यात येणार असून ते सर्वांसाठी खुले असणार आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. कुसुम मित्रा, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संदीप पाटील, प्रा. भावना पाटील, चित्रकार व शिल्पकार श्री. निरंजन शेलार, ज्येष्ठ कलाशिक्षक शाम कुमावत, सुबोध कांतायन, प्रमोद पाटील, चुडामण पाटील, विजय पाटील, परशुराम पवार, निलेश शिंपी, राहुल सोनवणे, सागर मोरे, संदीप परदेशी, चैतन्य नवगिरे व पालकांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.



