नायलॉन मांजा वापरणारे,आणि विक्री करणारे सावधान,होणार गुन्हा दाखल.

जळगांव-
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग महोत्सवात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा विक्री व वापर केला जातो. मात्र यंदा हा मांजा विक्री करणारे तसेच त्याचा पतंग उडविण्यासाठी वापर करणारे कायद्याच्या कचाट्यात येणार आहेत. नायलॉन मांजा आढळल्यास थेट सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न अशा स्वरुपाचा गंभीर गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत.नायलॉन किंवा सिंथेटिक मांजा हा मानवी जीवास आणि पशुपक्ष्यांस अत्यंत घातक आहे. या मांजामुळे गळा कापल्याने अनेकनागरिकांचे बळी गेल्याच्या दुर्देवी घटना घडल्या आहेत. एखादा विक्रेता जेव्हा नायलॉन मांजा विकतो, तेव्हा त्याला हे पूर्णतः माहित असते की या मांजामुळे कोणाचा तरी जीव जाऊ शकतो. तरीही नफ्यासाठी तो विक्री करत असेल, तर हे कृत्य (बी एन एस) ह्या नवीन कायद्यानुसार सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न या व्याख्येत येते. हा गुन्हा अजामीनपात्र असून त्यात दहा वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत साध्या वेशातील विशेष पथके तयार करण्यात आली असून ते ग्राहक बनून दुकानांची तपासणी करतील. दुकानीतचं नव्हे तर गोदाम अथवा घरांमध्ये छुप्या पध्दतीने मांजाचा साठा केला आहे,तिथेही छापा टाकण्याची योजना आहे.
नागरिकांना करण्यात आले आवाहन
पालकांनी त्यांच्या मुलांना नायलॉन मांजा घेऊन देऊ नये. नायलॉन मांजा तुटत नाही, त्यामुळे दुचाकीस्वारांच्या गळ्याला फास लागून गंभीर अपघात होतात तसेच विजेच्या तारांवर अडकल्यास शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो, सजग राहावे, असे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. परिसरात विक्री अथवा मांजाचा वापर होत असल्यास ११२ या हेल्पलाईनवर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




