खडकदेवळा हायस्कूल मध्ये डिजिटल क्लासरूम.
पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील माध्यमिक विद्यालय, खडकदेवळा येथे संस्थेच्या सचिव श्रीमती रूपालीताई जाधव यांच्या हस्ते डिजिटल क्लासरूमचे नुकतेच उद्घाटन झाले. याप्रसंगी विश्वस्त प्रमोद गरुड, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा सोनवणे, पर्यवेक्षक श्रीमती कुंदा पाटील- शिंदे, विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विश्वासराव पवार ट्रस्ट संचलित माध्यमिक विद्यालय खडकदेवळा या शाळेत 3 वर्गांमध्ये डिजिटल क्लासरूम तयार करण्यात आल्या आहेत. या डिजिटल क्लासरूम मुळे विज्ञान, गणित, भूगोल यासह भाषा व इतिहास विषयांचे अध्ययन आणि अध्यापन अत्यंत सुलभ व सोपे झाले आहे. नवीन शिक्षण तंत्र प्रणालीच्या माध्यमातून अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया ग्रामीण भागातील शाळा खोल्यांमध्ये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे मुख्याध्यापिका सुरेखा सोनवणे यांनी बोलताना सांगितले. या नवीन डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होऊन त्यांचा बौद्धिक विकास होईल -असे मत विश्वस्त प्रमोद गरुड यांनी यावेळी बोलताना सांगितले. या डिजिटल क्लासरूमच्या व्यवस्थापन व संचलनासाठी ज्येष्ठ शिक्षक सुभाष जाधव, आर.डी. सूर्यवंशी, नानासाहेब पाटील, चंद्रकांत पाटील, स्वप्निल बागुल, सागर परदेशी यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.