नांद्रा जि.प.शाळेचा पियुष मोरे ‘नवोदय’ला पात्र; तिसरी पासूनच्या परिश्रमाचे चीज!


पाचोरा-
जिद्द, अफाट परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नांद्रा तालुका पाचोरा येथील पियुष प्रशांत मोरे याने इतिहास घडवला आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश मिळवून, या शाळेतून नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरणारा तो पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. जवाहर नवोदय विद्यालय साकेगाव (भुसावळ) येथील विद्यालयात त्याची निवड झाली असून, त्याने आपल्या आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवले आहे.
स्वतःची जिद्द शिक्षकांचे मार्गदर्शन आणि १०० प्रश्नपत्रिकांचा सराव
ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या पियुषने इयत्ता तिसरीपासूनच या परीक्षेचा ध्यास घेतला होता. केवळ स्वप्न न पाहता ते पूर्ण करण्यासाठी त्याने प्रचंड परिश्रम घेतले. खेळण्या-बागडण्याच्या वयात पियुषने अभ्यासाचे सातत्य राखले आणि चिकाटीने १०० पेक्षा अधिक सराव प्रश्नपत्रिका सोडवल्या. जळगाव जिल्ह्यातील साधारण १३,००० विद्यार्थ्यांच्या अटीतटीच्या स्पर्धेत, जिथे केवळ ८० जणांची निवड होते, तिथे पियुषने ९५ गुण मिळवून आपल्या जिद्दीच्या जोरावर बाजी मारली.पियुषच्या या ऐतिहासिक यशात त्याचे मार्गदर्शक शिक्षक सचिन बाळासाहेब जोशी सर यांचा सिंहाचा वाटा आहे. जोशी सरांनी पियुषमधील गुणवत्ता ओळखून त्याला इयत्ता तिसरीपासूनच विशेष मार्गदर्शन दिले होते , इयत्ता तिसरी मंथन या स्पर्धा परीक्षेत देखील तो पाचोरा शहरी विभागातील केंद्रात यशस्वी ठरला होता.स्पर्धा परीक्षेचा पाया पक्का करण्यासाठी सरांनी घेतलेली मेहनत आणि पियुषने दिलेली त्याला परिश्रमाची साथ, यामुळेच हे यश शक्य झाले. आता त्याचे इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे सीबीएसई (CBSE) शिक्षण मोफत होणार आहे.
नांद्रा शाळेचा आणि गावाचा अभिमान
जि. प. प्राथमिक शाळा, नांद्रा येथे विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांचा पाया पक्का करून घेण्यासाठी विशेष लक्ष दिले जाते. पियुष हा शाळेचा पहिला नवोदय पात्र विद्यार्थी ठरल्याने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल आमदार किशोर आप्पा पाटील, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे , गटशिक्षणाधिकारी विजय पवार , शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील व सौ. सरोज गायकवाड यांनी पियुष व मार्गदर्शक जोशी सरांचे अभिनंदन केले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र जगन्नाथ गोसावी, विद्या जोशी,प्रतिभा पाटील,स्मृती साबळे ,आप्पासाहेब पी.एस.पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.के.पाटील, भगवान सोनार, किरण सोनार, प्रविण सोनार,शिक्षक वृंद , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिभु सातपुते, उपाध्यक्ष संदीप सुर्यवंशी,गुलाब बाविस्कर , स्वप्नील पाटील,सरपंच सुभाष तावडे , उपसरपंच शिवाजी तावडे,ग्रामपंचायत सदस्य योगेश सुर्यवंशी, किशोर खैरनार, अग्निपंखचे घनश्याम खैरनार, पत्रकार राजेंद्र पाटील,प्रा यशवंत पवार, यांच्या वतीने पियुषचे कौतुक व अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.



