पाचोरा-भडगावातून शिवसेना-उबाठाच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळणार:लोकसभा निवडणुकीच्या मेळाव्यात वैशालीताई सुर्यवंशी यांचे प्रतिपादन
पाचोरा-
”जळगाव लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या प्रत्येक उमेदवाराला पाचोरा-भडगाव मतदारसंघातून नेहमीच मताधिक्य मिळालेले आहे. यामुळे आता शिवसेना-उबाठा पक्षाच्या वतीने तिकिट हे कुणालाही मिळाले तरी त्याच उमेदवाराला नक्कीच मोठे मताधिक्य मिळणार !” असे प्रतिपादन शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजीत पक्षाच्या मेळाव्यात बोलत होत्या.
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना-उबाठा पक्षाला मिळणार असून येथून अलीकडेच पक्षात आलेल्या अमळनेर येथील ज्येष्ठ नेत्या ललिताताई पाटील या उमेदवार असतील असे संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर, ललिताताई पाटील यांनी पाचोरा येथील पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात आज सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ललिताताई पाटील यांचे आगमन होताच त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले.
या मेळाव्याला ललिताताई पाटील यांच्या सोबत वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष उध्दवराव मराठे, अरुण पाटील उपजिल्हाप्रमुख शेतकरी सेना , रमेश जी बाफना शेतकरीनेते, शरद पाटील तालुकाप्रमुख, बाळू अण्णा पाटील, राजू काळे, भरत खंडेलवाल, विकास वाघ, सय्यद गफ्फार भाई, संतोष पाटील, हरिभाऊ पाटील, संजय चौधरी, राकेश सोनवणे, अरुण तांबे पप्पू जाधव, अभिषेक खंडेलवाल, हरीश देवरे, मनोज चौधरी, जयश्री येवले, सुनिता पाटील, कुंदन पांड्या, संगीता पाटील सह सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून राज्यातील सत्ताधार्यांवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, सध्या राज्यात मोठे धाकाचे वातावरण आहे. तरीही अनेक जण याला बळी पडले नाहीत. आम्ही निष्ठेने गेल्या दोन वर्षांपासून लढा देत आहोत आणि पुढे देखील देणार आहोत. खरं तर लोकसभा निवडणूक लढवण्याची माझे वडील स्वर्गीय आर ओ तात्या पाटील यांची खूप इच्छा होती त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली. यंदा माझ्या नावाची देखील चर्चा सुरू होती, मात्र मी आधीच विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली असून यात यश मिळवणारच आहे. शिवसेना-उबाठा पक्षाच्या माध्यमातून ज्यांनाही तिकिट मिळेल त्यांना पाचोरा आणि भडगाव मतदार संघातील जनता भरभरून मताधिक्य देईल असा आशावाद वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.