पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे येथे बंद घरात आढळले मोठे भुयार;महसूल प्रशासनाने घेतली दखल
पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे येथील विलास बाबुराव पाटील यांच्या घरामध्ये सुमारे वीस फूट खोलीचे मोठे भुयार आढळून आले असून या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.या घराचे मालक विलास पाटील हे पोलीस दलात कार्यरत असून पाचोरा शहरातील आशीर्वाद ड्रीम सिटी येथे राहतात. तर वाडी या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या मालकीचे मती विटांचे एक मोठे घर आहे.विलास पाटील पाचोरा शहरात वास्तव्यात असल्याने त्यांचे या घरात मागील अनेक दिवसांपासून जाणे येणे नव्हते.दरम्यान आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांनी काही कामानिमित्त घर उघडून बघितले असता घरामध्ये सुमारे वीस फूट खोल व दहा फूट रुंदीचा मोठा खड्डा पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती पाचोरा उपविभागाचे प्रांताधिकारी भूषण अहिरे तसेच तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना दिल्यानंतर प्रशासनाने या विषयाची तातडीने दखल घेऊन घटनास्थळाचा पाहणी करण्यासाठी धाव घेतली आहे.अचानक पडलेल्या या भुयाराची गावात व परिसरात मोठी चर्चा असून नेमके हे भुयार कशामुळे पडले ?जमिनीचा भाग खचला की यातून भुयारी मार्ग आहेत? याविषयी तर्क वितर्क व्यक्त केले जातात.