मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे अर्ज मिशन मोडवर भरा; जिल्हाधिकारी यांचे गटविकास अधिकाऱ्यांना आदेश
जळगाव-
सरकारने संपूर्ण राज्यभर लागू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची जळगाव जिल्हाभरात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या योजनेचे अर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागातर्फे २८ जूनपासून लागू झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपयांची मदत मिळणार आहे. योजनेची जळगाव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, लाभार्थी महिलांचे नुकसान होऊ नये, यासाठी सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्यासोबतच विविध उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
लाभार्थी महिलांना बँक खाते उघडण्यासाठी तालुक्यातील बँक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून सर्व लाभार्थी महिलांचे बँक खाते उघडले जातील याची सुनिश्चिती करणे, पंचायत समिती कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयातील जन्म दाखल्यांच्या अभिलेखातून लाभार्थ्यांना जन्म दाखल्यांच्या नकला तत्काळ पुरविण्यासाठी नियोजन करणे, आपले सरकार सेवा केंद्रावर अर्ज स्वीकृती करणे, तपासणी करणे, पोर्टलवर अपलोड करण्याचे नियोजन करणे, प्रत्येक गावांत योजनेची दवंडी देऊन सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा प्रसार करण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी नियोजनबद्ध होईल. लाभार्थ्यांना योजनेचा सुलभ लाभ मिळेल, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. योजनेच्या अनुषंगाने अडचणी आल्यास जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत पातळीवर या योजनेचे अर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लाभार्थी महिला, अंगणवाडीसेविका, बचत गटाचे अध्यक्ष, सचिव, ग्रामसेवक या योजनेचे अर्ज भरून देऊ शकतात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करणे किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही शुल्क शासनातर्फे आकारले जात नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांनी पैसे देऊ नयेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले आहे.