जळगाव जिल्हा

ट्रान्सफार्मर बसवा, अन्यथा तीव्र आंदोलन; शिवसेना-उबाठाचा इशारा,वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली महावितरणला निवेदन

पाचोरा-

”गिरड रोडवरील वीज उपकेंद्रात आधी मंजूर करण्यात आलेले 25 एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर तातडीने बसविण्यात यावा, अन्यथा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दणकेबाज स्टाईलने आंदोलन करण्यात येईल” असा इशारा आज पक्षातर्फे महावितरणला निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज पाचोरा येथील वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना ट्रांसफार्मर तातडीने बसवण्याच्या मागणीचे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा तालुक्यातील गिरड रोडवरील 132/11 केव्हीए क्षमतेच्या उपकेंद्रामध्ये पूव दहा केव्हीए क्षमतेचे दोन ट्रांसफार्मर होते. मात्र क्षमतेपेक्षा जास्त विजेची मागणी असल्यामुळे ते ग्राहकांना वीज उपलब्ध करून देण्यात अपूर्ण पडत होते. यामुळे या दोन्ही ट्रांसफार्मरच्या ऐवजी एकच पंचवीस एमव्हीए क्षमतेचे दोन ट्रांसफार्मर बसवण्यास शासनाने मंजुरी दिल्याचे याआधी जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर दहा एमव्हीए क्षमतेचा एक ट्रांसफार्मर काढून टाकत त्याच्या ऐवजी मंजूर झालेला 25 एमव्हीए क्षमतेचा एक ट्रांसफार्मर तिथे बसवण्यात आला. मात्र अलीकडेच दहा एमव्हीए क्षमतेचा दुसरा ट्रांसफार्मर देखील नादुरुस्त झाल्यानंतर काढून टाकण्यात आला. यामुळे येथे सद्यस्थितीत एकच 25 एमव्हीए क्षमतेचा ट्रांसफार्मर कार्यरत आहे. लोकप्रतिनिधींनी या आधी जाहीर केलेला 25 एमव्हीए क्षमतेचा दुसरा ट्रान्सफॉर्मर अद्यापही येथे बसवण्यात आलेला नाही. तो गायब झाला की काय ? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.

दरम्यान या ट्रांसफार्मर पाचोरा शहरातील अर्धा भाग तसेच खेडगाव नंदीचे, बिल्दी, सातगाव, हडसन, पहाण, वेरूळी, वडगाव, अंतुर्ली, भातखंडे, परधाडे, खडकदेवळा, दोन्ही जारगाव, चिंचखेडा, सारोळा, दोन्ही वाघूलखेडे, चिंचखेडे वगैरे गावांचा भाग येत असून तेथील ग्राहकांचा विजेचा भार यावरच पडलेला आहे. यामुळे या भागात अनेकदा वीज जाण्याचे प्रकार वारंवार होत असल्याचे दिसून येत आहे. या ट्रांसफार्मरवर क्षमतेपेक्षा जास्त भार आल्यामुळे अनेकदा वीज जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. दोन मंजूर झालेल्या ट्रान्सफार्मर पैकी एकच बसवल्यामुळे ही स्थिती ओढवलेली आहे. यामुळे 25 एमव्हीए क्षमतेचा ट्रांसफार्मर तातडीने बसून कार्यान्वित करणे गरजेचे आहे. वीज वितरण खात्याने तातडीने हा दुसरा ट्रान्सफार्मर कार्यान्वित करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.

या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असून याच्या होणाऱ्या परिणाम वीज वितरण खाते जबाबदार राहील असा इशारा या निवेदनात देण्यात आलेला आहे. या निवेदनावर शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, तालुकाप्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत, शहर प्रमुख दीपक पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, उपजिल्हा युवा अधिकारी संदीप जैन, माजी उपजिल्हाप्रमुख अभय पाटील, युवा अधिकारी शशी पाटील व अल्पसंख्यांक शहराध्यक्ष गफार सय्यद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाच्या प्रती जळगाव येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता, महापारेषणचे खडका येथील अभियंता, पाचोऱ्याचे आमदार तसेच महापारेषण गिरड रोड पाचोरा येथील उपकार्यकारी अभियंता यांना सुद्धा माहितीसाठी देण्यात आलेले आहे.

दरम्यान आज महावितरण प्रशासनाला निवेदन देण्याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्यासह उद्धव मराठे, शरद पाटील, अनिल सावंत, दीपक पाटील, अरुण पाटील, अभिषेक खंडेलवाल, संदीप जैन, अभय पाटील, हरीश देवरे, संजय चौधरी, गौरव पाटील, शशी बोरसे, शशी पाटील,गजानन सावंत, अरूण तांबे, बंटी हटकर, निखील भुसारे, संतोष पाटील, रोहित पाटील, किरण चौधरी, नाना वाघ, नितीन खेडकर, सोपान बाविस्कर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!