पुनगांव येथे शिक्षक दिनानिमित्त गावरत्न शिक्षक पुरस्कार वितरण संपन्न.
पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील पुनगांव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुनगांव ग्रामपंचायतीच्या वतीने पुनगांव हद्दीतील तीन शाळेच्या अकरा शिक्षकांपैकी एका शिक्षकाला उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल गावरत्न शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुनगांव ग्रामपंचायत ही गृप ग्रामपंचायत असुन त्यात मांडकी व पाचोरा शहराला लागून असलेल्या पुनगांव शिवाराचा भाग येतो. या तीन ही ठिकाणी जिल्हा परिषदेच्या एक एक शाळा आहेत. त्यात पुनगांव येथील जिल्हा परिषद शाळेत सातवी पर्यंत वर्ग गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू केले आहेत. शाळेतील शैक्षणिक दर्जा उत्तम असल्याने हाकेच्या अंतरावर असलेल्या पाचोरा शहरातील मोठ्या व इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना न पाठवता पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या पुनगांव च्या शाळेत दाखल करताना दिसतात. यामुळे शाळेची पटसंख्या टीकून आहे. या शाळेत शिक्षक मुलांच्या शिक्षणासाठी अवांतर शिक्षण देऊन, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, क्षेत्र भेटी, आनंद मेळावा या सारखे उपक्रम नेहमी घेत असतात म्हणून ही शाळा राज्यातील चारशे अठ्ठ्याएंशी शाळामधुन आदर्श शाळा म्हणून निवड झाली आहे. या साठी पुनगांव जिल्हा परिषद शाळेतील तंत्र स्नेही शिक्षक श्री अनिल बापुराव वराडे हे शैक्षणिक व बी एल ओ ची जबाबदारी सांभाळत शाळेसाठी उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करीत असतात म्हणून पुनगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सुनिता चिंतामण पाटील व उपसरपंच अनिल नारायण परदेशी, ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांनी ठरविले की या शैक्षणिक वर्षापासून आपण शाळेत उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकास गावरत्न शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करावे. त्यानुसार शिक्षक दिनाचे औचित्य साधत ग्रामपंचायतीने पाचोरा भडगांव विधानसभेचे आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते श्री अनिल बापुराव वराडे सर यांना उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल गावरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात केले. यावेळी वराडे सर यांचा सहपत्नीक शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह (ट्राफी)व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित आमदार किशोर अप्पा पाटील, पाचोरा पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी श्रीसमाधान पाटील, सरपंच सौ सुनिता पाटील, उपसरपंच अनिल परदेशी, मुख्याध्यापक भोकरे मॅडम, माजी मुख्याध्यापक भगवान बीडकर, तसेच माजी सरपंच सिताराम पाटील, प्रल्हाद पाटील, आबा सोनवणे सर, प्रल्हाद गुजर उपस्थित होते.
आमदार किशोर अप्पा पाटील यांनी शिक्षक दिनानिमित्त वराडे सरांसोबतच शाळेतील सर्व शिक्षकांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर पुनगांव जिल्हा परिषद शाळेच्या नुतन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच आमदार किशोर अप्पा पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की या पुनगांव गावाचा आदर्श घेण्यासारखा आहे या ठिकाणी एका शिक्षकाचा गावरत्न शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते आहे. कदाचित तालुका व जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत व गाव असेल ज्या ठिकाणी शिक्षकाला गावरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
तसेच तालुका शिक्षणाधिकारी समाधान पाटील यांनी सांगितले की पुनगांव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्या शिक्षकास गावरत्न शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले त्याबद्दल मी गावाचे व पुनगांव ग्रामपंचायतीचे आभार मानतो. अशा प्रकारे शिक्षकांच्या उत्साह वाढविण्यासाठी प्रयत्न केले तर निश्चितच शिक्षक शिक्षिका ह्या सुध्दा केलेल्या सन्मानाचे भान ठेवून शाळेचं नाव लौकीक करतील, आज जिल्हा परिषदेच्या शाळेत पटसंख्या टीकून ठेवणे ही खुप अवघड झाले आहे त्यासाठी शिक्षणासोबतच मुलांना व्यवहारीक ज्ञान, सांस्कृतिक व सामाजिक कार्याची गोडी निर्माण करुन विद्यार्थी घडविण्याचे काम शाळेतून केले जाते. या शाळेची गुणवत्ता चांगली व आदर्श शाळा असल्याने याची दखल घेत आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या प्रयत्नामुळे शाळेस पंच्यानंव लाखांचा निधी मंजूर झाला आहे त्यामुळे पुढील काळात पुनगांव जिल्हा परिषद शाळा नक्कीच नावारूपाला येईल असे शिक्षणाधिकारी समाधान पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले. यानंतर आबा सोनवणे सर, सिताराम पाटील सर, प्रविण अप्पा पाटील, साहेबराव सुरवाडे सर, यांनी देखील शाळे बाबतीत गौरवोद्गार काढले.शेवटी गावरत्न शिक्षक पुरस्कार प्राप्त करणारे अनिल वराडे सर यांची सत्काराला उत्तर देताना सांगितले की मी गेल्या सहा वर्षांपासून या शाळेत विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून गावाला व शाळेला एकत्रीत जोडण्याचा प्रयत्न करून शाळेविषयी ग्रामस्थ व पालक यांचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून त्यांचा विश्वास संपादन करण्यास यशस्वी झालो आहे.मिळालेला सन्मान व पुरस्कार हा माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी राहील,गावाने केलेला सन्मानाला खरे उतरून शाळेसाठी विद्यार्थ्यांना १००% न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे सत्कारमूर्ती अनिल वराडे सर यांनी सांगितले. या कार्यक्रमास तीनही शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन व संचालक दुध डेअरी चे संचालक व चेअरमन, ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच व सदस्य, पोलीस पाटील, शिक्षणप्रेमी माता पालक अंगणवाडी सेविका व मदतनीस व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन चिंतामण पाटील यांनी केले,तर आभार आबा सोनवणे सर यांनी मानले.