दहिगाव संत सह परिसरात एकाच रात्री तब्बल ६ ठिकाणी घरफोड्या;
१६ तोळे सोन्याचे दागिने, ३ लाखांची रोकड केली लंपास.
पाचोरा-
तालुक्यातील दहिगाव संत, माहेजी, वरसाडे या गावात एकाच रात्री चोरट्यांनी तब्बल ६ बंद घरे फोडुन १६ तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के, ३ लाख १० हजार रुपयांची रोकड लंपास करुन पोबारा केला आहे. कडाक्याच्या थंडीत ग्रामस्थ गाठ झोपेत असल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी आपले काम दाखविले आहे. दहिगाव संत येथील ग्रामस्थांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील तीन तर एरंडोल तालुक्यातील एका गावात रात्रीचा व कडाक्याच्या थंडीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे दरवाजे तोडुन तब्बल १६ तोळे सोन्याची दागिने, चांदीचे दागिने यासह ३ लाख १० हजार रुपयांची रोकड लंपास करुन पोबारा केला आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके हे पथकासह घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा केला. तसेच घटनास्थळी जळगाव येथील फिंगरप्रिंट तज्ञ, श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.
पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील धरमसिंग जयसिंग पाटील हे पुणे येथे खाजगी रुग्णालयात त्यांचा मुलगा उपचार घेत असल्याने पत्नीसह पुण्यास गेलेले होते. त्यांचा बंद घराचा फायदा उचलत चार चोरट्यांनी घरातील १२ तोळे सोन्याची दागिने, रमेश गुलाबसिंग पाटील यांचे बंद घरातुन साडेतीन तोळे सोन्याची दागिने व ४० हजार रुपयांची रोकड, प्रताप बाबुलाल पाटील यांचे घरातुन १५ ग्रॅम सोने, २० भार चांदीचे दागिने व २ लाख ६० हजार रुपयांची रोकड आणि विठ्ठल विजयसिंग पाटील यांचे घरातुन १० हजार रुपये रोख असा १६ तोळे सोन्याची दागिने व ३ लाख १० हजार रुपये रोख चोरट्यांनी चोरुन नेले आहे. यासह पाचोरा तालुक्यातील माहेजी येथील मेडिकल शाॅप व एक बंद, वरसाडे येथे दोन बंद घरे चोरट्यांनी फोडले मात्र याठिकाणाहुन चोरट्यांच्या हाती निराशा आली.
चोरटे सी सी टीव्ही त झाले कैद.
पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत, माहेजी, वरसाडे या गावांसह एरंडोल तालुक्यातील भातखेडा या गावात एकाच रात्री घरफोड्या करुन पसार झालेले चोरटे सी. सी. टी. व्ही मध्ये कैद झाले असून दोन मोटरसायकल वरुन चार चोरट्यांनी चोरी केल्याचा पाचोरा पोलिसांना संशय असुन त्या दिशेने पोलीसांनी तपास चर्के सुरू केली आहे.