नवी मुंबईतील हॉटेलमध्ये मंचुरियनमध्ये आढळला उंदीर;महिलांनी घातला गोंधळ

नवीमुंबई-
नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 4 मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी येथील पर्पल बटरफ्लाय हॉटेल मध्ये जेवायला गेलेल्या महिलांनी ऑर्डर केलेल्या मंचुरियन मध्ये चक्क उंदीर आढळला. महिलांनी याबाबत ताबडतोब हॉटेल व्यवस्थापकाकडे याबद्दल तक्रार केली. यानंतर, हॉटेल कर्मचाऱ्यांनी बराच वेळ त्यांची चूक मान्य केली नाही. त्यानंतर महिलांनी हॉटेलमध्ये एकच गोंधळ घातला आणि आपला निषेध व्यक्त केला. त्यानतंर हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांची चूक मान्य केली.या प्रकरणी महिलांनी रबाळे पोलीस ठाण्यात जाऊन हॉटेल व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला. महिलांनी दाखवलेल्या छायाचित्रांच्या आधारे पोलीसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हॉटेलची पाहणी केली. महिलांनी म्हटले आहे की, केवळ एवढ्यावरच त्या शांत बसणार नाहीत. हॉटेल मालक आणि व्यवस्थापनाविरुद्ध योग्य कारवाई करावी यासाठी त्या अन्न विभागांकडे तक्रार करणार आहेत.या महिलांचे म्हणणे आहे की, हे लोक असेच निष्काळजीपणाने काम करत राहतील आणि लोकांच्या आरोग्याशी खेळत राहतील, म्हणून संपूर्ण हॉटेल कर्मचाऱ्यांना धडा शिकवणे आवश्यक आहे. तक्रारदार ज्योती कोंडे यांनी सांगितलं की, आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी त्या इतर महिलांसोबत फिरायला गेल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या सर्व मैत्रिणींनी ठरवले की, त्या सर्वजण पर्पल बटरफ्लाय हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतील.दरम्यान, सर्व महिला हॉटेलमध्ये गेल्या आणि त्यांनी तिथे विविध प्रकारचे पदार्थ ऑर्डर केले. परंतु, यावेळी मंचुरियन खात असताना त्यांना जेवणात एक उंदराचे पिल्लू दिसले. जेव्हा त्यांनी याबाबत व्यवस्थापकाकडे तक्रार केली तेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी एकमेकांवर दोषारोप करण्यास सुरूवात केली. तसेच तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना इतर पदार्थ वाढायला सुरुवात केली, मात्र, महिलांनी जेवणास नकार देत थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.




