गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत, पोलीसाने उकळले,१ लाख २० हजाराची खंडणी, आमदार मंगेश चव्हाण यांनी गाठले पोलीस स्टेशन..

चाळीसगाव-
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात एका पोलीस कर्मचाऱ्यानेच बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी एका कॉम्प्युटर व्यावसायिकाला दिली. त्यावर तो थांबला नाही तर त्याने त्या कॉम्प्युटर व्यावसायिका कडून लाखो रुपयांची खंडणी घेतली. याची तक्रार व्यावसायिकांनी दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. स्थानिक आमदार मंगेश चव्हाण यांनी संबधित पोलीसाविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत तब्बल चार तास पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून संशयित पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्ये संशयित पोलीस कर्मचारी अजय पाटील यांचे विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी संशयित पोलीस कर्मचारी अजय पाटील यांच्या घराची झाडाझडती घेतली असता खंडणीचे 1 लाख 20 हजार रुपये देखील पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्याला खंडणी मागणे चांगलेच महागात पडले आहे.
चाळीसगाव शहरातील एका कॉम्प्युटर व्यावसायिकाला संशयित पोलीस कर्मचारी व त्याच्या साथीदारांनी बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर कॉम्प्युटर व्यावसायिकाला ३ लाखांची खंडणी मागण्यात आली. मात्र तडजोडी अंती १ लाख २० हजार रुपये खंडणी संशयित पोलीस कर्मचारी आणि त्याच्या साथीदारांनी घेतल्याची तक्रार कॉम्प्युटर व्यावसायिकाने केली आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला. शिवाय संशयित पोलीस कर्मचाराविरुद्ध तात्काळ खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तब्बल चार तास आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून अखेर या प्रकरणी पोलिसांनी संशयित पोलीस कर्मचारी अजय पाटील याच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी अजय पाटील यांच्या घराची झाडाझडती घेतली असता खंडणीचे १ लाख २० हजार रुपये पोलीसांनी हस्तगत केले आहेत. संशयित पोलीस कर्मचाऱ्यांचा मोबाईल देखील पोलीसांनी जप्त केला आहे.
आपल्या मतदार संघात असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे. तसेच या सर्व प्रकरणाची आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याकडून चौकशी करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे.




