पाचोरा नगरपरीषदेने साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वच्छता मोहिमेस दिली गती.

पाचोरा-
शहरात साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाचोरा नगरपरिषदेने स्वच्छता मोहिमेला गती दिली आहे. गल्लीबोळ आणि अडगळीतील जागांवर डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येत आहे. यासह नागरिकांनी या साथीच्या आजाराबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन पालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले आहे.

मुख्याधिकारी बाविस्कर यांनी नागरीकांच्या मागण्यांची दखल घेत संपूर्ण शहरभर डास प्रतिबंधक फवारणी मोहीमेची आखणी केलेली आहे. त्याची अंमलबजावणी टप्प्या टप्पयाने करण्यात येणार आहे.

त्याच प्रमाणे नागरीकांना पाणीसाठवणीचे साहित्य आठवड्यातून एकदा स्वच्छ करावे, त्यावर नियमित झाकण ठेवावे, गळके नळ वेळीच दुरुस्त करणे, घराभोवती कचरा साठवू नये, पावसाचे व सांडपाणी साचणार नाही, याची दक्षता घेणे, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी डबकी, रिकामे टायर्स, डबे, बॅरेल, नारळ करवंटी, वॉटर कुलर, फ्रीज आदी साहित्याची आठवड्यातून एकदा स्वच्छता करावी, आठवड्यातील एक दिवस कोरडा दिन पाळावा. पाण्यांच्या टाक्यांवर झाकण ठेवली पाहिजे,परिसरातील पाण्याची डबके बुजविले पाहिजे किंवा त्यात राँकेल अथवा खराब आँईल टाकले पाहिजे,घरातील खिडक्यांना जाळ्या बसविल्या पाहिजे,बाजारात डासांपासुन संरक्षण असणाऱ्या साधणांचा वापर केला पाहिजे, झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा.तसेच ताप आल्यास दुर्लक्ष न करता ताबडतोब वैद्यकिय उपचार घ्यावीत.

वरील काळजी घेतल्यास डेग्यु,मलेरिया आजारांपासुन संरक्षण होऊ शकते.असे आवाहन मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले आहे. त्याच प्रमाणे ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका कर्मचारी यांचे संयुक्त पथक तयार करुन संपुर्ण शहरात डेंग्यु जनजागरण करीत विविध भागात ॲबेट औषण डबके, साचलेले पाणी यांवर टाकण्यात येत आहे.





