जळगाव जिल्हासंपादकीय

आज ६ जानेवारी मराठी पत्रकार दिन

संपादक- कुंदन बेलदार

दिनांक ०६/०१/२०२४
आज ६ जानेवारी मराठी पत्रकार दिन आहे. वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र आजच्या दिवशी सुरू केले होते. बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण नावाचे एक वृत्तपत्र सुरू केले होते. त्यामुळं आजचा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो.

‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत. ६जानेवारी १८१२ ला कोकणात एका सामान्य घरात जन्माला आलेल्या बाळशास्त्री यांचे जीवनमान अवघ्या ३४ वर्षांचे होते. पण त्यांच्या विचारांचा ठेवा, कार्याची पद्धत आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात मोलाचा वाटा आहे. बाळशास्त्री जांभेकर यांचे पहिलं मराठी दैनिक ६ जानेवारीला छापुन प्रसिद्ध झाल्याने हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. आजच्या ‘मराठी पत्रकार दिनी’ जाणून घेवूयात त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी.

१९ व्या शतकाच्या सुरूवातीला जेव्हा भारतामध्ये ब्रिटीश राजवटीची सुरूवात झाली होती तेव्हा त्या काळात बाळशास्त्री जांभेकर हे विद्याविभुषित, पंडीत व्यक्तिमत्त्व काम करत होते.
‘बॉंबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. इ.स. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली.
जेम्स ऑगस्टस हिकीच्या इंग्रजी ‘बेंगॉल गॅझेट’ या साप्ताहिकानंतर बाळशास्त्रींनी ५० वर्षांनी दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केलं.
दर्पण ६जानेवारी १८३२ ला प्रसिद्ध झाला आणि अवघ्या २० वर्षांच्या पण पंडीत असणार्‍या बाळशास्त्री जांभेकरांनी संपादकपदाची धुरा सांभाळली.
जांभेकरांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख आणि ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली.
दर्पण साडेआठ वर्ष चालला. नंतर जुलै १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला होता.
बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले. समाजातील वर्ण व्यवस्था, जातीभेद, स्त्री दास्य, सती, अस्पृश्यता, बालविवाह यांवर त्यांनी दर्पणच्या माध्यमातून लिखाण केल्याने त्यांना आद्य समाजसुधारकही म्हटलं जाऊ लागले.
बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक या दहा भाषांचे ज्ञान होते. भाषांसोबतच विज्ञान, गणित, भूगोल, शरीरशास्त्र आणि सामान्य ज्ञान या विषयांचीही चांगली जाण होती.

PBN महाराष्ट्र चा वतीने सर्व पत्रकार बांधव व भगिनींना हार्दिक शुभेच्छा

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!