रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या दाम्पत्याची कार विहिरीत सापडली

जळगाव-
तेलंगणाहून जळगावकडे मोटारीने निघालेले एक दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या मागे घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी दाम्पत्याचा सर्व दिशांनी तपास सुरू केला होता. अखेर शनिवारी सायंकाळी उशिरा महामार्गालगतच्या एका खोल विहिरीतून दोघांच्या मृतदेहासह कार बाहेर काढण्यात आली.जळगाव जिल्ह्यातील डोकलखेडा (ता. पाचोरा) येथील मूळ रहिवाशी असलेले पद्मसिंह दामू पाटील (४९) हे तेलंगणातील सीतापुरम येथे एका खासगी सिमेंट कंपनीत नोकरीला होते. ते पत्नी नम्रता (४५) यांच्यासह २७ नोव्हेंबरला सकाळीच डोकलखेडा गावाकडे मोटारीने लग्नकार्यासाठी निघाले होते. घर सोडल्यानंतर त्यांची चुलत भावाशी शेवटचे सायंकाळी भ्रमणध्वनीवर बोलणे देखील झाले होते. नियोजनानुसार ते रात्री १० वाजेपर्यंत लग्नस्थळी डोकलखेडा येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. वारंवार प्रयत्न करूनही ते कुटुंबियांच्या संपर्कात आले नाहीत. रात्री १० वाजेपर्यंत पद्मसिंह पाटील हे पत्नीसह जळगावला न पोहोचल्याने कुटुंबियांची चिंता वाढली. काही वेळ वाट पाहिल्यानंतर संदीप पाटील यांनी पद्मसिंह यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा भ्रमणध्वनी बंद येत होता. त्यानंतर त्यांनी पद्मसिंह यांची पत्नी नम्रता यांना फोन लावला. परंतु त्यांचा फोनही बंद येत होता.
२७ नोव्हेंबरपासून नातेवाईकांनी सतत संपर्क करण्याचा आणि शक्य त्या सर्व मार्गांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाटील दाम्पत्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर तातडीने दाम्पत्याची शोध मोहीम सुरू केली. भ्रमणध्वनी लोकेशनच्या आधारे तपास करताना, पाटील दाम्पत्याचे शेवटचे लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव–मलकापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडनेर भोलजी (ता. नांदुरा) गावाच्या परिसरात आढळले. भोलजी येथूनच त्यांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे पोलीस भोलजी गावाच्या परिसरात दाम्पत्याचा सगळीकडे शोध घेत होते. त्या कालावधीत महामार्गावर कुठेच अपघात घडलेला नसल्याने पोलिसांनी दाम्पत्याचा घातपात झाल्याचा संशय देखील व्यक्त केला होता.दरम्यान, शोध कार्य सुरू असतानाच वडनेर उड्डाणपुलाजवळील महामार्गालगतच्या झाडा-झुडुपांनी वेढलेल्या एका विहिरीत शनिवारी दुपारनंतर कारसह पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर कारसह दाम्पत्याचे मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.




