पाचोरा येथील माजी सैनिकाचा अनोखा उपक्रम;मतदान करा व मोटार सायकल दुरुस्तीत सूट मिळवा
पाचोरा –
जळगांव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मजबुतीकरण व मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वार्थाने विविधांगी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मतदान जागृती अभियानाला गती देण्यात आली आहे. सोशल मीडियासह शाहिरी पोवाडे , पथनाट्य , विविध गाणी , स्लोगन , जनजागरण रॅली अशा विविध मार्गाने शासकीय यंत्रणा व सेवाभावी संस्था संघटना प्रयत्न करीत आहे.तसेच दिव्यांग व जेष्ठ नागरिक यांचे घरबसल्या मतदान करून घेतले जात आहे. अशा या विविधांगी प्रयत्नात येथील माजी सैनिक तथा माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळू पाटील यांनी मतदान जागृती साठी राबवलेला अनोखा राष्ट्रीय उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे. बाळू पाटील यांचे पाचोरा येथे जारगाव चौफुली परिसरातील खडकदेवळा रोडवर धनलक्ष्मी गॅरेज आहे. त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढावी व मतदारांना मतदानासाठी प्रेरित करावे यासाठी ता 13 ते 25 मे दरम्यान ‘मतदान करा व मोटार सायकल दुरुस्तीत दहा टक्के सूट मिळवा’ असा अनोखा उपक्रम राबवला आहे . या उपक्रमाचे उद्घाटन मंडळ अधिकारी विजय येवले व सहाय्यक फौजदार भगवान बडगुजर यांच्या हस्ते डिजिटल बॅनर लावून व पूजन करून करण्यात आले. ता 13 मे रोजी मतदान केल्यानंतर बोटाला लावलेली शाई दाखवल्यावर मोटार सायकल मालकास मोटार सायकल दुरुस्ती मजुरी व स्पेअर पार्ट यात दहा टक्के सूट दिली जाणार आहे. ता 25 मे पर्यंत मोटार सायकल मालकांना या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. या अनोख्या उपक्रमामुळे बाळू पाटील यांचा माजी सैनिक संघटना , मॉर्निंग वॉक व योगा गृप तसेच शिक्षक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. बाळू पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत असून या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी धनलक्ष्मी गॅरेजचे मेकॅनिक गजानन मराठे , नंदू शेलार ,मनोज पाटील , हर्षल जंजाळ यांचेसह मॉर्निंग वॉक वयोगा ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र पाटील , प्रगतिशील शेतकरी बापू बडगुजर , शशिकांत पाटील , प्राचार्य संजय पाटील , प्रा सी एन चौधरी ,प्रा डी पी वाणी , भास्कर पाटील ,
सामाजिक कार्यकर्ते अनिल येवले ,पीपल्स बँकेचे निवृत्त लेखापाल आर आर वाणी , निवृत्त सहाय्यक फौजदार अशोक पाटील , उपशिक्षक किरण महाजन , निवृत्त कंडक्टर मंगलसिंग राजपूत , छोटू बडगुजर , एलआयसी अधिकारी नितीन मोराणकर , ग स सोसायटीचे निवृत्त अधिकारी चंद्रकांत शेलार , माजी सैनिक किशोर पाटील व माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी ,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्कल विजय येवले यांनी प्रास्ताविक केले. प्रा सी एन चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.मेकॅनिक गजानन मराठे यांनी आभार मानले.