लोहटार! वेळेवर डॉक्टर हजर नसल्यामुळे नागरीकांनी ठोकले प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठा गलथान कारभार सुरु असल्याने आज दिनांक 14 मे मंगळवार रोजी सकाळी 9:00 वाजता गावातील सुज्ञ नागरिकांनी या आरोग्य केंद्रास कुलूप ठोकले. लोहटार गावातील गरीब महिला जनाबाई ह्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांना लोहटार प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथे एकही डॉक्टर व कर्मचारी उपचारासाठी हजर नसल्याने गावातील नातेवाईक व ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रात धाव घेत नेहमीच्या अशा बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावणार कोण, ग्रामीण रुग्णांची तपासणी करणार कोण असे म्हणत जर डॉक्टर आणि कर्मचारीच नसतील तर रुग्णालय केंद्रास कुलूप लावलेले बरे असे म्हणत कुलूप ठोकले, तसेच या ठिकाणी डॉक्टर व कर्मचारी नेहमीच गैरहजर असतात,मनाला वाटेल त्यावेळी उशिराने येतात, लवकर जातात, सुट्टीचा उपभोग घेतात मात्र आल्यावर अर्ज फाडून टाकतात, आपल्या कर्तव्यात कसूर करतात असे एक ना अनेक आरोप ग्रामस्थांनी केला, येथील सर्वच डॉक्टर्स, कर्मचारी स्टाफ ची बदली व्हावी अशी देखील विनंती त्यांनी वरिष्ठांकडे केली.
लोहटार प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास कुलूप ठोकल्याची माहिती मिळाल्याने तिथे जाऊन पाहणी केली असता गैरहजर असलेल्या बेजबाबदारीने वागणाऱ्या डॉक्टर कर्मचाऱ्यांची चौकशी करणार असून त्यांना लेखी नोटीसा देखील देण्यात येतील, तसेच त्यांची बदली करता येईल का यावर देखील विचार होईल, योग्य ती कारवाई तात्काळ केली जाईल. सदर केंद्र आरोग्य सेवेसाठी असल्याने रुग्णांना त्याचा फायदा वेळेवर होईल याकडे विशेष लक्ष दिले जाईल. – डी. के. लांडे – (तालुका वैद्यकीय अधिकारी)




