आसनखेडा बुद्रुक येथे सुशोभीकरणाच्या बांधकामाची तोडफोड;अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल
पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील आसनखेडा बुद्रुक येथे सुशोभीकरण बांधकामास ग्रामपंचायतीने दिलेल्या जागेच्या ठरावाला काही स्थानिकांचा विरोध असल्याने दिनांक २९ बुधवार रोजी मध्यरात्री अज्ञातांकडून या सुशोभीकरणाच्या सुरु असलेल्या बांधकामाची तोडफोड करण्यात आली आहे.
ठेकेदार सैंदाणे यांकडून याबाबत पाचोरा पोलिसात तक्रार दिल्यावरुन अज्ञाता विरोधात ४२७ कलमा खाली तक्रारीची नोंद करण्यात आली आहे.
पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी संपूर्ण तालुक्यात प्रत्येक गावात सुशोभीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. प्रत्येक गावात सुशोभीकरणासाठी पाच लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या सुशोभीकरणाच्या जागा उपलब्ध करून तसा ठराव मंजूर करून देण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतींची होती. या आसनखेडा बुद्रुक येथील शिवस्मारक सुशोभीकरणाच्या कामासाठी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कार्यालय समोर बाजार पट्ट्याची जागा निश्चित केली होती. परंतु काही ठराविक घटकांकडून या जागेबाबत विरोध होत असल्याने या सुशोभीकरणाच्या कामाची नासधूस करण्यात आली आहे. या ठिकाणाहून बांधकाम साहित्याची ही चोरी झाल्याची तक्रार संबंधित ठेकेदार दिनेश सैदाणे यांनी पाचोरा पोलीसात दिली आहे.