विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास लोहारी,आर्वे ग्रामस्थ करणार ४ जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन!
पाचोरा-
सद्यस्थितीत सगळीकडेच विद्युत,वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे विद्युत ग्राहक त्रस्त झाले आहेत. कारण वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे, कमी दाबाने विद्युत पुरवठा मिळणे, एका बाजूला विद्युत ग्राहकांना वाढीव बिल येणे तर दुसरीकडे विद्युत चोरांकडे दुर्लक्ष करणे, विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात न रहाणे, पावसाळा सुरु होण्यापूर्वी ट्री कटींग न करणे, शेत शिवारातील तसेच गावातील झुकलेले विद्युत खांब, लोंबळकणाऱ्या तारा अशा बऱ्याचशा समस्यांना विद्युत ग्राहक मागील दोन वर्षांपासून वैतागले आहेत.
आता पावसाळा सुरु झाल्यापासून पाचोरा तालुक्यातील लोहारी खुर्द, लोहारी बुद्रुक व आर्वे गाव परिसरात व शेती शिवारात विद्युत पुरवठा सुरळीत रहात नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याबाबत लोहारी व आर्वे ग्रामस्थांनी वरखेडी येथील सहाय्यक अभियंता मा. अमित चव्हाण यांच्याकडे समस्या सोडविण्यासाठी वारंवार तोंडी व लेखी स्वरुपात निवेदन देऊनही आजपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत रहात नाही.
ही समस्या सोडविण्यासाठी विद्युत ग्राहक जेव्हा सहाय्यक अभियंता मा. श्री. अमित चव्हाण यांच्याकडे विचारणा करतात तेव्हा करतो, होऊन जाईल, काम सुरु आहे अशी उत्तरे मिळत होती. तर कधी, कधी सहाय्यक अभियंता हे ग्राहकांशी हमरीतुमरीवर येऊन तुम्हाला पाहिजे तेथे तक्रार करा अशी भाषा वापरत असल्याने सरतेशेवटी लोहारी व आर्वे येथील ग्रामस्थांनी विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी दिनांक ०४ जुलै २०२४ गुरुवार रोजी पाचोरा ते जामनेर रस्त्यावर लोहारी बसस्थानक परिसरात रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला असून निवेदनाच्या प्रती अधिक माहिती पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील, मा. सहाय्यक अभियंता विद्युत वितरण कंपनी वरखेडी, मा. कार्यकारी अभियंता व उप अभियंता विद्युत वितरण कंपनी पाचोरा, मा. प्रांताधिकारी साहेब व मा. तहसीलदार साहेब पाचोरा व मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळगाव हरेश्वर यांच्याकडे पाठवल्या आहेत.