स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाने एक हात-पाय गमावला,पाय घसरत लोकलमध्ये चढण्याचा VIDEO झाला होता व्हायरल,
मुंबई-
मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणे ही काही नवी गोष्ट नाही. अशा घटनांत आतापर्यंत अनेकांनी आपले प्राणही गमावले आहेत. अशाच एका स्टंटबाजाचा लोकलमध्ये पाय घसरून चढण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता त्याने एका स्टंटमध्ये आपला एक हात व पाय गमावल्याचे निष्पन्न झाले. अवघ्या आयुष्याचा धडा मिळालेला सदर तरुण आता असहाय्यपणे अंथरुणावर पडून आहे.
मुंबईतील शिवडी रेल्वे स्थानकावर धावत्या लोकलमध्ये चढताना एक मुलगा धोकादायक स्टंट करताना दिसला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. तेव्हापासून रेल्वे पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर त्यांना त्याला शोधण्यात यश आले. त्यानंतर त्यांनी त्याचा एक नवा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला. त्यात सदर तरुणाचा एक हात व एक पाय स्टंटदरम्यान झालेल्या अपघातात गमावल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फरहत आझा शेख असे या स्टंटबाज तरुणाने नाव आहे. तो वडाळ्यातील अँटॉप हिल येथे राहतो. त्याचा स्टंट करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला शोधून काढले. रेल्वे पोलिस त्याच्या घरी धडकले असता त्याने आपला एक हात व पाय गमावल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याचा व्हिडिओ शूट करून आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला.
या व्हिडिओत फरहत आझा शेख एका खोलीत गादीवर पाय पसरून बसला आहे. त्यात त्याने आपला डावा हात व पाय गमावल्याचे दिसून येत आहे. त्याने सांगितले की, मी अँटॉप हिलमध्ये राहतो. माझा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर गत एप्रिल महिन्यातही मी असाच एक स्टंट करत होतो. पण दुर्दैवाने त्यात मी माझा एक हात व पाय गमावला.
या तरुणाची अवस्था पाहिल्यानंतर मध्य रेल्वेने प्रवाशांना असे स्टंट करण्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. रेल्वेने आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, मध्य रेल्वेने व्हायरल व्हिडिओत स्टंटबाजी करणाऱ्याची ओळख पटवली असून त्याने दुसऱ्या एका स्टंटमध्ये एक पाय आणि हात गमावला आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणामध्ये वेगवान कारवाई करत त्या मुलाचे प्राण वाचवले. आम्ही सर्व प्रवाशांना विनंती करतो की असे जीव धोक्यात घालणारे स्टंट करु नका. तुम्हाला असे कोणी करताना दिसले तर त्यासंदर्भात 9004410735/139 येथे माहिती द्या सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे.