मुंबई-
दहीसर येथील पश्चिम म्हात्रेवाडी येथील अमरनाथ अपार्टमेंटमध्ये आज सकाळी सोसायटी अध्यक्षाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत सदस्य आणि अध्यक्ष मध्ये वाद निर्माण झाला त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत सोसायटीच्या अध्यक्षाने एका सदस्याचा अंगठा तोडल्याची घटना घडली आहे.
मुंबईतल्या दहीसर येथील पश्चिम म्हात्रेवाडी येथील अमरनाथ अपार्टमेंटमध्ये सकाळी सोसायटी अध्यक्षा कडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला अध्यक्षासह सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी, सोयायटी सदस्य आदित्य देसाई आणि सोसायटी अध्यक्ष नित्यानंद परिहार यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. या झटापटीत अध्यक्ष नित्यानंद परिहार यांनी चक्क दाताने सदस्य असलेल्या आदित्य यांचा अंगठाच तोडल्याचा आरोप आदित्य देसाई यांनी केला आहे. या घटनेमुळे सोसायटीत चांगलीच खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अमरनाथ सोसायटीत झालेला वाद हा इतका विकोपाला गेला की नित्यानंद परिहार याने आदित्य देसाई या सदस्याचा अंगठा चावला. आदित्य देसाई यांचा अंगठा या घटनेमुळे तुटून जमिनीवर पडला. या घटनेनंतर आदित्य देसाई यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
आदित्य देसाई यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. त्यांच्या हाताला ड्रेसिंग करण्यात आलं आहे. या प्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.