पाचोरा येथील डब्ल्यू हॉटेलवर पोलीसांची कारवाई;मालकाविरुद्ध गुन्हा दाखल, शहरातील इतर लॉजिंग वरती पोलीस प्रशासनाकडून तपासणी होईल का?

पाचोरा-
पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील न्यू वाघ साई पॅलेस हॉटेल अॅण्ड लॉजिंग (डब्ल्यू हॉटेल) येथे दिनांक 28 मे 2025 रोजी दुपारी पोलीसांनी छापा टाकून एक युवक व युवती अश्लील वर्तन करताना पकडले. या प्रकरणात हॉटेलचे चालक व मालकाने ग्राहकांची पूर्ण माहिती न घेता रूम उपलब्ध करून दिल्याचे निदर्शनास आल्याने पोलीसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पाचोरा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस शिपाई संदिप राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे व पो.हे.कॉ. विश्वास देशमुख यांनी ही कारवाई केली. डब्ल्यू हॉटेलमध्ये काही संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी पंचासमक्ष छापा टाकला. तपासणी दरम्यान, रूम क्रमांक 1 मध्ये एक युवक व युवती आक्षेपार्ह स्थितीत आढळले.
हॉटेलच्या नोंदवहीत अपूर्ण माहिती आढळली असून, ग्राहकांची ओळख पटवणारे कोणतेही अधिकृत ओळखपत्र आढळून आले नाही.
या प्रकरणात हॉटेलचे चालक वाल्मीक बाळकृष्ण बोरसे (वय 37, रा. MIDC कॉलनी, कालंकी माता नगर, पाचोरा) आणि मालक अजिंक्य संजय वाघ (वय 35, रा. कोढवाडा गल्ली, पाचोरा) यांनी परवान्यातील अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129, 131(AA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
पाचोऱ्यात अजुन काही लॉजिंग मध्ये असा प्रकार सुरू असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे,या उर्वरित लॉजिंगची देखील पोलीस प्रशासनाने तपासणी करावी अशी मागणी देखील होत आहेत.