पाचोरा तालुक्यातील भक्तांवर काळाचा घाला;दुसखेडा जवळ रेल्वे लाईन क्रॉस करतांना अपघात! महिलासह पुरुष जागीच ठार.एक गंभीर जखमी.

पाचोरा-
दुसखेडा गावाजवळ रेल्वेलाईन क्रॉस करतांना कोणत्यातरी धावत्या रेल्वेत अडकून महिलेसह पुरुष जागीच ठार झाल्याची घटना सायंकाळी घडली असून एक जण जखमी झाला आहे. या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की,दि.२४ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान पाचोरा तालुक्यातील दुसखेडा गावातील बहुळा नदीला पाणी आले असल्याने नदीवरील पुलाजवळ थोड्याच अंतरावर काही महिला व पुरुष हे रेल्वे लाईन क्रॉस करीत असतांना दुसखेडा येथील महिला रत्नाबाई माधव पाटील (वय-५९)तर पहान येथील रहिवासी पण कुरंगी शिवारातील शेती करण्यासाठी सद्धया दोन वर्षांपासून दुसखेडा येथे रहात असलेले शेतकरी अशोक झेंडू पाटील(वय -६०) या दोन्हीचा भरधाव वेगाने जाणाऱ्या रेल्वेगाडीत अडकून अपघात झाला असून यात दोघे जागीच ठार झाले आहेत तर एक जण जखमी झाला आहे. सदर काही महिला व पुरुष हे काही कार्यक्रमानिमित्त परधाडे येथे हरीनाम सप्ताहास दुसखेडा येथून गेले होते कार्यक्रम आटोपून दुसखेडा गावी घराकडे परत जात असतांना दुसखेडा या गावाजवळ रेल्वे क्रॉसिंग करत असताना अचानक भरधाव वेगाने जाणाऱ्या रेल्वेखाली आल्याने अपघात झाल्याची घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जय मल्हार रुग्ण वाहिकेचे संचालक बबलू मराठे यांनी तत्काळ रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने शव सह जखमीस ताब्यात घेऊन पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले जखमीवर उपचार सुरू आहे या दुर्दैवी घटनेने दुसखेडा परिसरात शोककळा पसरली आहे.