दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यावर दुहेरी आघात! वडगाव टेक येथे गोडाऊन व गोठ्याला भीषण आग; चारा, शेती साहित्य जळून खाक, पाच लाखांहून अधिक नुकसान

पाचोरा –
आधीच दुष्काळाच्या झळांनी होरपळणारा शेतकरी आणि त्यातच आगीच्या भीषण संकटाने उद्ध्वस्त झालेला संसार… वडगाव टेक येथे घडलेल्या आगीच्या दुर्घटनेने परिसरातील नागरिकांचे मन हेलावून गेले आहे.वडगाव टेक येथील शेतकरी दिनकर ओंकार पाटील यांच्या गोडाऊन व गोठ्याला अचानक भीषण आग लागली. या आगीत दादरचा चारा, कुट्टी, शेतीकामासाठी लागणारी विविध अवजारे तसेच गोडाऊन व गोठ्याचे पत्रे जळून पूर्णपणे खाक झाले. या दुर्घटनेत पाच लाख रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
एकीकडे पावसाअभावी शेती संकटात सापडली आहे, तर दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत वर्षभर कष्ट करून साठवून ठेवलेला चारा आणि शेतीसाठी लागणारे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने दिनकर पाटील यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शेतकरी मोठ्या आशेने आपल्या जनावरांसाठी चारा साठवतो, शेतीच्या कामासाठी आवश्यक साहित्य जपून ठेवतो. मात्र काही क्षणांतच आगीने त्यांच्या कष्टाची कमाई राखरांगोळी केली. आधीच दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या या कुटुंबासाठी ही दुर्घटना मोठा आर्थिक आघात ठरली आहे.
घटनेची माहिती मिळताच मा. जिल्हा परिषद सदस्य पदम बापू पाटील यांनी तातडीने नगरपालिका अग्निशमन दलाला पाचारण केले. दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
यावेळी राजेंद्र पाटील (पोलीस पाटील) यांच्यासह गावातील प्रमुख नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सहकार्य केले.
प्रशासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा!
या भीषण दुर्घटनेमुळे दिनकर ओंकार पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला या संकटातून सावरण्यासाठी प्रशासनाने तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करावा. नुकसानीचे योग्य मूल्यांकन करून शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शेतकऱ्याचे वर्षभराचे कष्ट आगीने जाळून खाक केले; आता प्रशासनाच्या मदतीनेच या कुटुंबाला पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळू शकते. संकटाच्या या काळात दिनकर पाटील कुटुंबाला शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा जळगाव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पदम बापू पाटील यांनी व्यक्त केली आहे.



