राज्य

सेवा संकल्प अभियानांतर्गत शासकीय आश्रमशाळेत विविध स्पर्धा व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन


झिंगानूर,ता. सिरोंचा प्रतिनिधी- राजमोली दुर्गम

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, झिंगानूर येथे उत्साहात करण्यात आला.
अभियानाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, विकसित भारत, शिक्षण, आरोग्य तसेच सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्रे साकारत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यानंतर २१ सप्टेंबर २०२६ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये विशेषतः अॅनिमिया, सिकलसेल, रक्त तपासणी तसेच आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना योग्य आहार, स्वच्छता आणि निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले.
या अभियानाच्या कालावधीत शाळेत चित्रकला, रांगोळी, निबंध लेखन, वक्तृत्व, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा, बौद्धिक क्षमता आणि आरोग्यविषयक जागरूकतेला चालना देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
सेवा संकल्प अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुणांसोबतच आरोग्य आणि सामाजिक विषयांबाबत जागरूकता निर्माण होत असून, या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. आर. कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!