जिल्हा परिषद क्रीडा शिक्षक पदभरती पवित्र पोर्टलमार्फत होणार -शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे..

क्रीडा क्षेत्राला ऐतिहासिक बळ, पवित्र पोर्टलमार्फत ४८६० क्रीडा शिक्षक पदभरती महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक ०२ जानेवारी २०२६ रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यातील जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर केंद्रस्तरीय विशेष क्रीडा शिक्षक या संवर्गातील ४८६० नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. सदर जिल्हा परिषदेमधील क्रीडा शिक्षकांची भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री श्री.दादासाहेब भुसे यांनी दिली आहे.
शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून सुदृढ, बलशाली राष्ट्रनिर्मिती तसेच क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी हा निर्णय निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी हा निर्णय ऐतिहासिक, दूरदृष्टीपूर्ण व स्वागतार्ह असल्याची भावना महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, संपूर्ण शारीरिक शिक्षक परिवार व सर्व शारीरिक शिक्षक संघटनांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रस्तरीय क्रीडा शिक्षक भरतीची सातत्याने मागणी केली होती. या मागणीसाठी महासंघाच्या शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्री, माननीय शालेय शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण विभागाचे सचिव (मंत्रालय), शिक्षण आयुक्त, तसेच राज्यातील विविध मंत्री, आमदार, खासदार यांची भेट घेऊन निवेदने सादर केली होती. तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व प्राथमिक शिक्षण अधिकारी यांना भेटूनही निवेदने देण्यात आली होती.
या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज यश मिळाले असून, ४८६० क्रीडा शिक्षक पदांना शासनाने मंजुरी दिल्याने महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या मागणीला मान्यता मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा निर्णय म्हणजे महासंघाच्या संघटित प्रयत्नांचे व सकारात्मक संघर्षाचे फलित असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.राज्यातील विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व नैतिक विकास साधण्यासाठी क्रीडा शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. हे ओळखून माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री यांच्या सक्षम नेतृत्वाखाली तसेच माननीय शालेय शिक्षण मंत्री यांच्या संवेदनशील व सकारात्मक भूमिकेमुळे हा बहुप्रतीक्षित निर्णय प्रत्यक्षात येऊ शकला, असे महासंघाच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व समूह साधन केंद्रांमध्ये प्रत्येकी एक क्रीडा शिक्षक पद मंजूर करून शासनाने क्रीडा शिक्षकांच्या वर्षानुवर्षांच्या मागणीला न्याय दिला आहे. यामुळे केवळ क्रीडा शिक्षकांनाच नव्हे, तर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण क्रीडा शिक्षणाचा लाभ मिळणार आहे. हा निर्णय म्हणजे क्रीडा शिक्षणाला शासनाने दिलेले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट होते.सदर भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत पूर्णपणे ऑनलाईन, पारदर्शक व मेरिट-आधारित पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शासनाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. या निर्णयामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वासार्हता व समान संधी सुनिश्चित होणार असून पात्र उमेदवारांना न्याय मिळणार आहे.या ऐतिहासिक निर्णयाबद्दल माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय शालेय शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण विभागाचे सचिव, शिक्षण आयुक्त, शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित सर्व यंत्रणांचे महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, संपूर्ण शारीरिक शिक्षक परिवार व सर्व संघटनांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहेत. भविष्यातही क्रीडा शिक्षणाच्या बळकटीसाठी शासन असेच सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास महासंघाने व्यक्त केला आहे.




