कोपरगाव-
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांड प्रकरणातील आरोपी कोपरगाव दुय्यम कारागृहातून रुग्णालयात नेताना पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी, १ जूनला रात्री १ वाजेच्या सुमारास कोपरगाव तहसील कार्यालयाजवळ घडली आहे. सदरच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खूनाच्या गुन्ह्यातील कैदेत असलेला आरोपी पसार झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव शहरातील दुय्यम कारागृह येथे कैदेत असलेला खून प्रकरणातील आरोपी योगेश सर्जेराव पारधे(रा.कोल्हार ता.राहता जि.अ.नगर)याला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास रक्ताची उलटी झाली. आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस हेड कॉ. पिनू बाबूराव ढाकणे हे दुचाकीवरून ग्रामीण रुग्णालयात नेत होते. पण गाडीची वळणावर गती कमी झाल्याचा फायदा घेऊन आरोपी दुचाकीवरून उडी मारत पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला. यावेळी पोलीस कर्मचारी पिनू ढाकणे यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला.
ढाकणे यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठून ठाण्यात सदर माहिती दिली. पोलीस हेड कॉ. पिनू बाबुराव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी योगेश सर्जेराव पारधे याच्याविरुद्ध रजिस्टर नंबर २६०/२४ भारतीय दंड विधान कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी आरोपीच्या शोधासाठी तपासाची चक्री फिरवून पथक रवाना केले. घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करत आहेत.