…ह्या दिवशी होवू शकतात, मुख्यमंत्री “माझी लाडकी बहिण” योजनेतील लाभार्थी महिलांचा खात्यात…
मुंबई-
बहिण भावाच्या पवित्र नात्याला अधिक घट्ट करणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पहिले 1500 रुपये जमा करून राज्य शासनातर्फे रक्षाबंधनाची ‘ओवाळणी’ देण्यात येणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घोषणा केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची सध्या जोरदार चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकार महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील शासकीय कार्यालयांमध्ये महिलांची मोठी गर्दी होत आहे.
सुरुवातीला या योजनेच्या पात्रतेचे नेमके निकष काय यावरुन बराच संभ्रम होता. आता त्याबाबत स्पष्टता आल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार, याची उत्सुकता आहे. 1जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. परंतु, अजूनही अर्ज भरण्याचीच प्रक्रिया सुरु असल्याने योजनेचे पैसे कधी मिळणार, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहे.
राखी पौर्णिमा 19 ऑगस्टला आहे. त्यापूर्वी पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ सुरू करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यावर जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात येणार असल्याचे समजते.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला 15 जुलै होती. मात्र, महिलांचा प्रचंड प्रतिसाद पाहून राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहेत, त्यावरुन 16 जुलैला पात्र लाभार्थ्यांची प्राथमिक यादी प्रसिद्ध केली जाईल. तर 1 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल. साधारण 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा होईल, असे सांगण्यात येत आहे.