जवान भूषण बोरसे यांना सुर्यवंशी दाम्पत्याची आदरांजली
पाचोरा-
दिनांक १०/१०/२०२४
पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द नवेगाव शिवारात वीज पडून मयत झालेले वीर जवान भूषण बोरसे यांना वैशालीताई आणि नरेंद्रसिंगदादा सूर्यवंशी यांनी आदरांजली अर्पण केली. या संदर्भातील वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली नं. ३ येथील भुषण आनंदा बोरसे (वय ३४) हे शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा अकाली मृत्यू झाल्याची घटना झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. भूषण बोरसे हे गेल्या आठ वर्षांपूर्वी एस.एस.बी.सिमा सुरक्षा बलामध्ये भर्ती झाले होते. दरम्यान अवघ्या दोन दिवसांपुर्वीच भुषण बोरसे हे दिवाळीनिमित्त सुट्टी घेवुन घरी आले होते. त्यातच ही दुदैवी घटना घडली आहे.दरम्यान, आज भूषण आनंदा बोरसे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी वैशालीताई आणि नरेंद्रसिंगदादा सूर्यवंशी यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण केली. त्यांनी बोरसे कुटुंबियांचे देखील सांत्वन केले. जवान भूषण बोरसे याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, ४ वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.