शेंगोळा गावात घाणीचे साम्राज्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात,सरपंच व ग्रामसेवक यांचे दुर्लक्ष

जामनेर-
जामनेर तालुक्यातील शेंगोळा गावात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले दिसुन येत आहे. गावातील रस्त्यांवरून गटारीचे सांडपाणी वाहत असून,लहान मुलांसह संपूर्ण गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या गंभीर परिस्थितीकडे गावचे सरपंच जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

शेंगोळा गावात पत्रकार बांधवांनी गावाला भेट दिली असता ही धक्कादायक बाब समोर आली.गावातील मुस्लिम समाजाचे पवित्र धार्मिक स्थान मजीद परिसरात अक्षरशः घाणीचे ढीग साचले आहेत. इतकेच नव्हे तर हनुमान मंदिर परिसरातही स्वच्छतेचा बोजवारा उडालेला असून, मंदिराजवळ घाण पसरलेली आहे. धार्मिक स्थळांजवळील ही अस्वच्छता प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण ठरत आहे.संपूर्ण गावात पसरलेल्या घाणीमुळे डेंग्यू, मलेरिया, त्वचारोग, पोटाचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिक त्रस्त झाले असून, ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, जामनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना ISO दर्जा मिळाल्याचा गाजावाजा केला जातो. मात्र शेंगोळा ग्रामपंचायतीचा हा भोंगळ कारभार ISO दर्ज्याची पोलखोल करणारा ठरत आहे.

आता खरा प्रश्न असा आहे की आरोग्य धोक्यात असताना प्रशासन जागे होणार का?सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई होणार का? की नागरिकांच्या जीवाशी असा खेळ सुरूच राहणार?शेंगोळा गावातील नागरिक आता तात्काळ स्वच्छता मोहीम, गटारी दुरुस्ती आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही, तर हा प्रश्न आणखी गंभीर रूप धारण करू शकतो.यावर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी शेंगोळा गावाकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.



