दिल्ली संसद मोर्चाला CPI चा पाठिंबा; एटापल्लीत निवेदन, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

एटापल्ली-(सिरोंचा प्रतिनिधी-राजमोगली दुर्गम)
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) ने कॉम्रेड सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित संसद भवन मोर्चाला जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकारविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयासमोर CPI कार्यकर्त्यांनी राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या नावे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.हे निवेदन कॉ. सचिन मोतकुरवार (जिल्हा सहसचिव, CPI) यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. निवेदनात जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलन व उपोषणाची तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.CPIने निवेदनात म्हटले आहे की, जंतर-मंतरवरील आंदोलन हे केवळ एका व्यक्तीचे नसून देशभरातील विद्यार्थी, युवक आणि सामान्य नागरिकांच्या भावना व्यक्त करणारे आहे. देशात वारंवार घडणाऱ्या पेपर लीकच्या घटनांमुळे शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता गंभीरपणे ढासळली असून लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.पक्षाने केंद्र सरकारवर शिक्षण क्षेत्रातील वाढत्या अव्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि पेपर लीक प्रकरणांबाबत नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सांगितले की, “देशातील शिक्षण व्यवस्था गंभीर संकटात आहे. वारंवार होणारे पेपर लीक हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेले अन्याय आहे. केंद्र सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा CPI व्यापक जनआंदोलन उभारेल.”या प्रसंगी कॉ. सुरज जककुलवार (जिल्हा सदस्य, CPI), पक्षाचे अन्य कार्यकर्ते तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




