लोहारीच्या सुपुत्राला दिला शासकीय इतमामात अखेरचा निरोप…

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील लोहारी गावचे सुपुत्र आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले जवान बापू उखा कोळी (वय ४४) यांना कर्तव्य बजावत असतानाच वीरमरण आले. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे विधानसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गेले असताना २७ मार्च रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (३० मार्च) रोजी मूळगाव लोहारी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नाशिक येथील नोट प्रेस युनिटमध्ये कार्यरत असलेले बापू कोळी यांची पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार नाशिकहून सुमारे ९० जवानांची तुकडी रेल्वेने जलपाईगुडीकडे रवाना झाली होती. प्रवासादरम्यान स्थानकाजवळ त्यांना अचानक चक्कर आली आणि हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.२४ वर्षांची निष्ठावंत देशसेवा लहानपणापासूनच देशसेवेची तीव्र इच्छा असलेल्या बापू कोळी यांनी प्रचंड मेहनतीच्या जोरावर २ ऑगस्ट २००२ रोजी CISF मध्ये प्रवेश मिळवला. अत्यंत साध्या व आर्थिकदृष्ट्या कठीण परिस्थितीतून पुढे येत त्यांनी तब्बल २४ वर्षे देशाच्या विविध भागांत प्रामाणिक सेवा बजावली. नाशिक येथील नोट प्रेस येथे ते हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच लोहारी गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली.शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आज सोमवार रोजी सकाळी त्यांच्या पार्थिवाची गावातून पार्थिवयात्रा काढण्यात आली. संपूर्ण गावाने आपल्या सुपुत्राला अश्रूपूर्ण निरोप दिला. मुलगा तन्मय बापू कोळी याने मुखाग्नी देत अंत्यसंस्कार विधी पार पाडला.या वेळी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, नगरसेवक सुमित किशोरआप्पा पाटील, खासदार स्मिता वाघ यांच्या कन्या भैरवी वाघ पलांडे, तहसीलदार विजय बनसोडे, सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा, सरपंच रंजना पाटील, पोलिस पाटील विजय जोशी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विश्वनाथ उगले, तसेच ग्रामस्थ व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशसेवेसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या या वीर जवानाच्या निधनामुळे संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत असून, “वीर जवान अमर रहे” अशा घोषणांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.



