लसीकरणानंतर अवघ्या दहा मिनिटांत अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निर्दयी कारभार,रात्री मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवण्यास नकार..

जळगाव-
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. नियमित लसीकरणानंतर अवघ्या दहा मिनिटांत अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. झाल्याची घटना घडली असून,या दुःखात सांत्वन मिळण्याऐवजी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्दयी कारभार पाहायला मिळाला. यावेळी मृत बालिकेच्या आजोबांना रात्रभर नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन शवविच्छेदन गृहाच्या बाहेर बसावे लागले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य प्रशासनाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेत नियमित लसीकरण सत्र सुरू होते. सचिता दीपक बोरसे हिला पोलिओचा डोस आणि इतर आवश्यक लस देण्यात आल्या. लस टोचल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत चिमुकलीची हालचाल मंदावली. ती निपचित पडली. तिला तातडीने चाळीसगावच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले, पण तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. सचिताचे वडील दीपक बोरसे हे भारतीय सैन्यदलात असुन ते अयोध्या येथे कार्यरत आहेत.
या घटनेनंतर बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आणण्यात आला. रात्री दोन वाजेच्या सुमारास आजोबा तुळशीदास मराठे मृतदेह घेऊन पोहोचले. मात्र, तांत्रिक कागदपत्रांचे कारण पुढे करत रुग्णालय कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. शवविच्छेदन सकाळी करा, पण मृतदेह किमान पेटीत तरी ठेवा, अशी विनंती आजोबांनी केली, मात्र ती विनंती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धुडकावून लावल्यामुळे मयत चिमुकलीचा आजोबांना आपल्या लाडक्या नातीचा मृतदेह रात्रभर उघड्यावर मांडीवर घेऊन बसावे लागले.या घटनेनंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश चौधरी यांनी यावर भाष्य करताना सांगितले की, “हा बालिकेचा लसीकरणाचा दुसरा डोस होता. यापूर्वीच्या डोसमध्ये तिला कोणताही त्रास झाला नव्हता. त्यामुळे थेट लसीकरणामुळेच मृत्यू झाला असे म्हणणे घाईचे ठरेल. आम्ही वैद्यकीय तज्ज्ञांची समिती नेमली असून, व्हिसेरा रिपोर्ट आणि शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल.”अश्या प्रकारची माहिती त्यांनी दिली
लसीकरण सुरक्षित आहे की नाही, हा तांत्रिक प्रश्न बाजूला ठेवला तरी, एका मृत बालिकेच्या देहाची विटंबना करणाऱ्या रुग्णालय प्रशासनावर कारवाई होणार का? हा प्रश्न आता विचारला जात आहे. देशासाठी सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या जवानाचा मुलीच्या वाट्याला जर ही परवड येत असेल, तर सामान्य जनतेचे काय? असा संतप्त सवाल जळगावकर विचारत आहेत.



