पाचोरा शहरासह ग्रामीण भागात राजरोसपणे सुरू विमल गुटख्याची विक्री; अन्न सुरक्षा विभागाचे दुर्लक्ष

पाचोरा-
महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात धडक कारवाया सुरू असताना पाचोरा शहर व ग्रामीण भागात मात्र विमल गुटख्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा विभागाचा धाक संपला आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळखोर व प्रतिबंधित पदार्थ विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले. त्याच अनुषंगाने पाचोरा येथेही जळगाव अन्न सुरक्षा विभागाने सुमारे ४.९८ लाखांचा गुटखा व ४ लाखांचे वाहन जप्त करत मोठी कारवाई केली होती. मात्र या कारवाईनंतरही शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक टपऱ्यांवर चढ्या दराने विमल गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री सुरूच असल्याचा आरोप होत आहे.प्रश्न असा निर्माण होतो की, जर किरकोळ विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात गुटखा उपलब्ध होत असेल, तर त्यामागील घाऊक पुरवठादार कोण आहेत? शहरात दुचाकीवरून गुटखा पोहोचवणाऱ्यांपर्यंत हा माल नेमका कसा पोहोचतो? हा प्रतिबंधित माल इतर राज्यांतून आणला जातो का? याची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक असल्याची मागणी होत आहे.
काही सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून प्रभावी कारवाई होत नाही. त्यामुळे गुटखा माफियांचे मनोबल वाढत असून प्रतिबंधित पदार्थांची विक्री बिनधास्त सुरू आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या कठोर कारवाईच्या आदेशांची पाचोरा शहरात प्रत्यक्ष अंमलबजावणी होते आहे का? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. जिल्हा अन्न सुरक्षा विभागाने तातडीने विशेष मोहीम राबवून घाऊक पुरवठादार, साठेबाज आणि किरकोळ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
प्रतिबंधित गुटख्याची विक्री थांबवायची असेल, तर केवळ एक-दोन कारवाया नव्हे तर सातत्यपूर्ण आणि कठोर धडक मोहीम राबवून दोषींवर कायदेशीर कारवाई करणे ही काळाची गरज आहे.



