जळगाव जिल्हा

एसीला लागणार्‍या गॅस बाटलाचा स्फोट;२७ वर्षीय तरूण गंभीर जखमी-डाॅ सागर गरूड यांनी वाचविले तरूणाचे प्राण


पाचोरा-

जळगावहुन पाचोर्‍यात येणार्‍या कुरीअर सेवेतुन ए. सी. च्या काॅम्प्रेसरला लागणार्‍या गॅसचा बाटलाचा अचानक स्फोट होवुन या दुर्घटनेत कुरीअर सेवा देणारा २७ वर्षीय तरूण कंबरेखाली गंभीर रित्या जखमी झाला. सूदैवाने सदरची घटना शहरातील विघ्नहर्ता मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या हाकेच्या अंतरावर घडल्याने जखमी तरूणास तत्काळ हाॅस्पिटलमध्ये दाखल केल्याने व हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. सागर गरूड, डाॅ. माळी यांच्या टिमने यूध्दपातळीवर उपचार करून तरूणाचे प्राण वाचविले. या घटनेमुळे कुरीअर सेवेत काम करणार्‍या असंख्य तरूणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत प्राप्त माहीती अशी की, शहरातील कृष्णापुरी भागात गेल्या काही वर्षापासुन जळगाव येथील पालवे ट्रान्सपोर्ट कंपनीची कुरीअर सेवा कार्यान्वित आहे. या पालवे ट्रान्स्पोर्ट द्वारे पाचोरा शहरातील विविध दुकानींना लागणार्‍या साहित्यांची पाचोरा शाखा ही वितरणाचे काम करीत असते.दिनांक २३ एप्रिल रोजी पालवे ट्रान्स्पोर्ट जळगाव येथुन अॅपे रिक्षाद्वारे पाचोरा येथे कुरीअर साहीत्य सकाळी प्राप्त झाले. या साहित्यात जळगाव येथील श्री. मथाणी यांनी पाचोरा येथील पोलीस लाईन समोरील प्रविण चौधरी यांचे श्री इलेक्ट्रॉनिक अॅण्ड रेफ्रिजरेटर दुकानासाठी दोन बाॅक्स कुरीअर पाठवले होते. सदरचे कुरीअर दुपारी १२ वाजता राहुल जगन महाजन (वय – २७) रा. कृष्णापुरी पाचोरा व सोबत दोन सहकारी यांनी संबधित दुकानदारास देत असतांना एका बाॅक्समधुन अचानक जोराचा स्फोट झाला. काय झाले हे समजण्याच्या आधीच बाॅक्स जवळ असलेल्या राहुल महाजन याच्या कमरेच्या खाली गंभीर दुखापत होवुन तो रक्तबंबाळ झाला. घटनास्थळावरून राहुल याच्या सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ विघ्नहर्ता हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता डाॅ. सागर गरूड व त्यांच्या वैद्यकिय  टिमने तात्काळ उपचार सुरू करून गंभीर जखमी असलेल्या तरूणास जीवनदान दिले.
    
एसीच्या काॅम्प्रेसरला लागणार्‍या गॅसच्या बाटल्यामुळे झाला स्फोट.
जळगाव येथील ग्राहक मथाणी यांनी गॅस कुरीअर करतांना योग्य ती दखल घेतली नाही. तसेच बाॅक्समध्ये ज्वलंतशिल पदार्थ आहे अशी कोणतीही सुचना बाॅक्सवर लिहीली नाही किंबहुना तो बाॅक्स कुरीअर करतांना जळगाव येथील पालवे ट्रान्स्पोर्ट कंपनीला काही एक माहीती न दिल्याने बाॅक्समध्ये काय आहे ही माहीती नसल्यामुळे हा अपघात घडला आहे. या अपघातामुळे कुरीअर सेवेमध्ये कार्यरत काम करणार्‍या तरूणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!