रेल्वेमार्गे गुटखा तस्करीचा पर्दाफाश; पाचोऱ्यात विक्रीसाठी आणणारा तरुण भुसावळात जेरबंद..

भुसावळ-
राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची रेल्वेमार्गे तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये कारवाई करत एका तरुणाला गुटख्यासह अटक केली. या कारवाईत 17 हजार 152 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून, आरोपी हा पाचोरा परिसरात गुटखा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांना अप क्रमांक 12628 कर्नाटक एक्स्प्रेसमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शनिवार (18 जुलै) रोजी दुपारी सुमारे 1.50 वाजता गाडी भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर येताच पोलिसांनी संशयित जनरल डब्याची झडती घेतली.तपासणीदरम्यान तीन संशयित बॅगा आढळून आल्या. पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचा सुगंधित पानमसाला व तंबाखू आढळून आला. याप्रकरणी विनय अर्जुन खेमानी (वय 20, झुलेलाल गल्ली, सिंधी कॉलनी, पाचोरा) याला ताब्यात घेण्यात आले.हवालदार विलास जगन्नाथ जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, पोलीस कर्मचारी जय कोळी, धनराज लुले, विलास जाधव आणि अंकुश लांडगे यांच्या पथकाने केली.
रेल्वेमार्गे तस्करीचे वाढते आव्हान
राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही तस्कर आता रेल्वेचा वापर करून मोठ्या प्रमाणात गुटखा खान्देशात पोहोचवत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर परिसरात गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने तेथून रेल्वेच्या गर्दीचा फायदा घेत तस्करी केली जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी अशा कारवायांची तीव्रता आणखी वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे.



