जळगावात ‘सैराट’ची पुनरावृत्ती,२६ वर्षीय तरुणाला निर्घृणपणे संपवलं,

जळगाव-
पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी तरुणासह त्याच्या कुटुंबीयांवर कोयते आणि चॉपरने प्राणघातक हल्ला केला. यात जखमी तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबातील सात जण जखमी झाले. ही धक्कादायक घटना रविवारी दि. १९ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता घडली. यामुळे काही वेळ परिसरासह शासकीय रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश रमेश शिरसाठ (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रेमविवाह केलेला तरुण आणि तरुणी दोघेही एकाच जातीचे आहेत.मृत मुकेशचा भाऊ सोनू रमेश शिरसाठ (वय २२, रा. भीमनगर, पिंप्राळा हुडको, जळगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याचा भाऊ मुकेशने तीन-चार वर्षांपूर्वी पूजा शिरसाठ हिच्याशी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. पूजाचे आई-वडील व भाऊ त्यांच्या घरापासून काही अंतरावर राहतात. मुकेशने पळून जाऊन प्रेमविवाह केला, याचा राग पूजाच्या माहेरच्यांना होता. त्यातूनच रविवारी सकाळी मुकेश दुकानावर वस्तू आणण्यासाठी बाहेर गेला होता. त्या वेळी पूजा हिचे काका सतीश केदार, भाऊ प्रकाश सोनवणे; तसेच त्यांच्याबरोबर सुरेश बनसोडे, बबलू बनसोडे, राहुल सोनवणे, पंकज सोनवणे, अश्विन सुरवाडे, विकी गांगले, बबल्या गांगले व इतर दोन अनोळखी तेथे आले. त्यांनी मुकेशला ‘तू पूजाशी पळून जाऊन लग्न केले. यापूर्वी तुला सोडून दिले होते आता मात्र तुझ्या परिवाराला संपवू अशी धमकी दिली.यावेळी मुकेश त्यांना समाजवत असतानाच त्यांनी कोयते आणि चॉपरने मुकेशच्या मानेवर गंभीर वार केले. मुकेशचा आरडा-ओरडा ऐकून त्याचा भाऊ सोनू, तसेच आई-वडील तेथे धावत आले असता त्यांनाही संशयितांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. सोनू यांच्या उजव्या बोटाच्या अंगठ्यावर तसेच पाठीमागून वार केले. यावेळी फिर्यादीचा चुलता नीळकंठ शिरसाठ व त्यांची मुले करण, कोमल, चुलती ललिता, लहान मुलगा हे तक्रार करण्यास रामानंदनगर पोलिस स्टेशनला जात असताना त्यांनाही संशयितांनी अडवले. त्यानंतर संशयित सतीश केदार व इतरांनी नीळकंठ, ललिता, करण, कोमल यांच्यावरही शस्त्रांनी हल्ला करून पोबारा केला. जखमींना कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यात गंभीर जखमी मुकेश याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.फिर्यादीवरुन सतीश केदार, प्रकाश सोनवणे, सुरेश बनसोडे, बबलू बनसोडे, राहुल सोनवणे, पंकज सोनवणे, अश्विन सुरवाडे, विकी गांगले, बबल्या गांगले व इतर अशा ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चार ते पाच संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.




