राज्य

सिरोंचा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवेबाबत नागरिकांमध्ये नाराजी;दहा दिवसांत कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा

सिरोंचा-(प्रतिनिधी राजमोगली दुर्गम)

ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कथित दुर्लक्षामुळे गोरगरीब रुग्णांना आवश्यक उपचारांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. किरकोळ आजारांवरील रुग्णांनाही बाहेर रेफर केले जात असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा सुरळीत करावी तसेच रुग्णांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या नावे तहसील कार्यालय, सिरोंचा यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते सय्यद सलाम भाई यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय हे तालुक्यातील गोरगरीब व दुर्गम भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. मात्र, येथे पुरेशा सुविधा व योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
दहा दिवसांचा अल्टिमेटम
सामान्य रुग्णांना किरकोळ उपचारांसाठीही बाहेर पाठविले जात असल्याने त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आरोग्य व्यवस्था सुधारावी, अशी मागणी करण्यात आली.
दहा दिवसांच्या आत योग्य कार्यवाही न झाल्यास उपोषण सुरू करण्यात येईल, तसेच सिरोंचा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
यावेळी नगरपंचायतीचे नगरसेवक रणजीत गागापुरपू, नरेश अलोने, इम्तियाज खान, सामाजिक कार्यकर्ते अफरोज सैय्यद, सिद्दिक भाई, रमेश बत्तूला, सुरेश पडीगेला, तौसिफ खान, शाहरुख शेख, रमेश तोकला, पत्रकार एम.डी. इरफान, जाकीर अली, बबलू खान, श्रीकांत शृंगारवार, नारायण शनिगारापू यांच्यासह दुर्गम भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोरगरीब जनतेच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!